"राज्यात सत्तांतर झाल्यानंतर निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे थांबली"
By शेखर पानसरे | Published: December 11, 2022 04:07 PM2022-12-11T16:07:40+5:302022-12-11T16:08:13+5:30
बाळासाहेब थोरात : म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नात माती कालविण्यासारखे
शेखर पानसरे
संगमनेर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुन्हा निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांना गती दिली, त्यासाठी भरीव निधी दिला. २०२२ च्या ऑक्टोबर महिन्यात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात निळवंडे धरणाचे पाणी देण्यासाठी रात्रंदिवस काम सुरू होते. परंतू जूनमध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे थांबली. अशी टीका माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
रविवारी (दि.११) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहात अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, एकवीरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, थोरात कारखान्याचे अध्यक्ष, राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, आर. बी. राहणे आदी उपस्थित होते.
कालव्यांची कामे बंद करणे म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नात माती कालविण्यासारखे आहे. कालव्यांची कामे लवकरात लवकर झाली पाहिजे. पाणी दुष्काळग्रस्तांना मिळाले पाहिजे, हाच कायम आग्रह राहणार आहे. निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागाला देणे हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे. अनंत अडचणींवर मात करत निळवंडे धरण पूर्ण केले. कालव्यांची कामे मार्गी लावली. २०१४ ते २०१९ या काळातही निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे थांबली होती. असेही माजी महसूलमंत्री, आमदार थोरात म्हणाले.