दोन महिन्यानंतर डोक्यावरील केसांना लागली ‘कात्री’; सलून व्यवसायिकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 04:02 PM2020-05-22T16:02:21+5:302020-05-22T16:03:31+5:30
चौथ्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्याचा समावेश ‘नॉन रेड’ झोनमध्ये झाल्याने शहरांसह ग्रामीण भागातील बहुतांश उद्योग व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील दाढी, कटींग करणाºया सलून व्यवसायालाही परवानगी मिळाल्याने अनेकांच्या डोक्यावरील केसांना तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच कात्री लागली.
बोधेगाव : चौथ्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्याचा समावेश ‘नॉन रेड’ झोनमध्ये झाल्याने शहरांसह ग्रामीण भागातील बहुतांश उद्योग व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील दाढी, कटींग करणाºया सलून व्यवसायालाही परवानगी मिळाल्याने अनेकांच्या डोक्यावरील केसांना तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच कात्री लागली.
शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह परिसरातील बालमटाकळी, चापडगाव, हातगाव, मुंगी, कांबी, लाडजळगाव आदी गावांतील उद्योगधंदे मागील लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सुरू करण्यात आले होते. मात्र त्यात सलून व्यवसायाचा समावेश नसल्याने खेड्यातील अनेक व्यावसायिकांना घरोघरी अथवा शेतामध्ये जाऊन दाढी-कटींगसाठी भटकावे लागले तर काहींनी व्यवसाय न करणेच पसंद केले होते. यामुळे हातावर पोट असणाºया व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, सध्या सलून व्यवसायालाही परवानगी मिळाल्याने बोधेगावसह परिसरात शुक्रवारी (दि.२२) सकाळी नऊ वाजताच दुकाने उघडण्यात आली. नव्या आदेशानुसार दुकाने उघडता येणार असल्याचे समजल्यावर अनेकांनी आदल्या दिवशीच दुकानातील धूळ झटकून साफसफाई केली होती. तसेच ग्राहकांसाठी सॅनिटायझर, हॅण्डवॉश व नवीन रूमाल, फेसवॉश आदी साहित्य उपलब्ध करून ठेवल्याचे दिसून आले. ग्राहकांची दाढी-कटींग करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून गर्दी न करता खबरदारी घेतली जात आहे.
माझे सलून दुकान जवळपास दोन महिन्यांपासून बंद होते. लॉकडाऊन काळात नेहमीच्या ओळखीतील काहींच्या दाढी-कटींगसाठी घरी किंवा शेतामध्ये जाऊन उन्हातान्हात भटकावे लागले. परंतु, सध्या सलून दुकाने उघडल्याने रोजीरोटीचा प्रश्न मिटला असून भटकंतीही थांबली आहे, असे बोधेगाव येथील सलून व्यावसायिक मच्छिंद्र वाघमारे यांनी सांगितले.