दीड वर्षाचा विरह संपला... भेटीनंतर पती-पत्नीला अश्रू अनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:17+5:302021-07-07T04:26:17+5:30
श्रीगोंदा : दीड वर्षापूर्वी ताटातूट झालेल्या पती-पत्नीची श्रीगोंद्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशात जाऊन भेट घडवून आणली. यावेळी झालेल्या भेटीने ...
श्रीगोंदा : दीड वर्षापूर्वी ताटातूट झालेल्या पती-पत्नीची श्रीगोंद्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशात जाऊन भेट घडवून आणली. यावेळी झालेल्या भेटीने या पती-पत्नीला अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांची भेट घडवून आणणारे कार्यकर्तेही गहिवरले.
उत्तर प्रदेशातील उतरौला येथील राजराणी किरसकर व तिचे पती गणेश किरसकर अशी भेट झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. श्रीगोंदा शहरातील मांडवगण रस्त्यावर राजराणी ही भटकंती करत होती. याची माहिती प्रहारचे कार्यकर्ते नितीन रोही यांना मिळाली. त्यानंतर रोही यांनी पुढाकार घेऊन राजराणीचा पती गणेश याच्याशी फोनवरून व्हिडिओ कॉल करत पत्नीची माहिती दिली. त्यानंतर दक्ष फाैंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप व नारायण ढाकणे यांनी राजराणीला दवाखान्यात अॅडमिट केले. त्यानंतर त्यांनी राजराणीला उतरौला (उत्तर प्रदेश) येथे पोहोच करण्याचे ठरविले.
पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी कायदेशीर अडचणी येऊ नयेत यासाठी उतरौला येथील पोलीस निरीक्षकांना पत्र दिले. ३२ तासांचा प्रवास करीत दत्ताजी जगताप व नारायण ढाकणे हे सामाजिक कार्यकर्ते राजराणीला घेऊन तिच्या गावी पोहोचले. तेथे गेल्यावर राजराणीने प्रथम श्रीकृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तिला पाहून तिच्या मुलीने ‘मेरी माँ’ म्हणून हंबरडा फोडला. त्यावेळी पती-पत्नीची भेट झाल्यानंतर दोघांनाही अश्रू अनावर झाले. यावेळी कार्यकर्तेही गहिवरले. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही मदत केली.
दत्ताजी जगताप व नारायण ढाकणे यांचा उतरौला येथे श्रीकृष्णाची मूर्ती भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी येथील प्रभारी पोलीस निरीक्षक पंकज सिंग त्यांच्या या कामाचे कौतुक केले.
----
०५ राजराणी
उत्तर प्रदेशातील उतरौला येथील राजराणी किरसकर व तिचे पती गणेश किरसकर यांची श्रीगोंद्यातील दत्ताजी जगताप व नारायण ढाकणे यांनी भेट घडवून आणली.