पबजी गेम्समुळे मुलांचा स्वभाव होतोय आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 02:34 PM2019-01-23T14:34:51+5:302019-01-23T14:36:17+5:30
व्हिडिओ गेम्सची तरुणाईला पडलेली भुरळ काही नवीन नाही.
रामप्रसाद चांदघोडे
घारगाव : व्हिडिओ गेम्सची तरुणाईला पडलेली भुरळ काही नवीन नाही. पोकेमॅन गो, ब्ल्यू व्हेलनंतर संगमनेर तालुक्यासह पठारभागात पबजी नावाच्या गेमने धुमाकूळ घातला आहे. या गेममुळे मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मागील काळात काही गेम्समुळे तरुणांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
पबजी हा अॅक्शनपॅड गेम असून हा खेळण्यात तरुण मुलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आॅनलाईन गेम असल्याने तसेच यात बोलणे आणि संदेश पाठविला जात असल्याने तरुणाईची या खेळाकडे चांगलीच ओढ लागली आहे. मुळात हा खेळ अठरा वर्षावरील मुलांसाठीच आहे. परंतु, कमी वयातील मुलेच जास्त खेळताना दिसत आहेत.
पबजी हा खेळ ग्रुप करून खेळला जातो. यात चार तरुण ते शंभर तरुण आॅनलाईन एकत्र येऊन हा गेम खेळतात. या खेळाचा या तरुणांवर इतका विपरीत परिणाम झाला आहे की, व्हॉट्सअॅपच्या स्टेटससुद्धा या पबजी गेमचे लावले जात आहेत. गेम समजत नसेल तर तासन्तास यू ट्यूबवर याचे व्हिडीओ पाहिले जातात.
पबजी गेम खेळतेवेळी तरुणांना आलेले महत्त्वाचे कॉल देखील रिजेक्ट केले जात आहेत.
हा गेम बंदुकीच्या साहाय्याने चोरांना मारणारा असल्याने या मारधाडीच्या खेळामुळे मुलांचा स्वभाव आक्रमक बनला आहे. त्यामुळे यावर अंकुश लावणे गरजेचे असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शालेय, महाविद्यालयाचा अभ्यास बाजूला सारत आपला पाल्य काय करतो? कुठे जातो? यात पालकांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.
अशा गेम्समुळे तासन्तास मोबाईल डोळ्यांसमोर असल्याने डोळ्यांचे आजार होण्याचा धोका असतो. चिडचीड व मानसिक तणाव निर्माण होते. इतर आजारही बळावू शकतात. पालकांनी वेळीच आपल्या पाल्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. -डॉ.राहुल आहेर, साईसिद्धी हॉस्पिटल, घारगाव, ता.संगमनेर.
पबजीसारख्या गेम्स मुलांना बघण्याची सवय लागते. मुलांचे अभ्यासाकडे लक्ष कमी होते. मुलांवर मानसिक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी वेळीच सजग होऊन मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. -डॉ.भाऊसाहेब डामसे, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, घारगाव, ता.संगमनेर.