आयुक्तांच्या निवासस्थानासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:18 AM2021-05-30T04:18:21+5:302021-05-30T04:18:21+5:30
अहमदनगर : शहरातील किराणा दुकाने, भाजीपाला व फळे विक्रीस परवानगी देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संजय झिंजे, शाकीर शेख व ...
अहमदनगर : शहरातील किराणा दुकाने, भाजीपाला व फळे विक्रीस परवानगी देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संजय झिंजे, शाकीर शेख व बहिरनाथ वाकळे यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन केले. निवासस्थानासमोर आंदोलन केल्याने आयुक्त चांगलेच संतापले. दरम्यान, आंदोलकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले. किराणा दुकान, फळे व भाजीपाला विक्रीवर असलेले निर्बंध उठविण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी शनिवारी सकाळी आयुक्तांच्या निवासस्थानासमोर घोषणा दिल्या. यावेळी आंदोलकांनी फलक हाती घेऊन घोषणाबाजी केली. निवासस्थानासमोर आंदोलक आल्याने आयुक्त गोरे आंदोलकांवर चांगलेच संतापले होते. आंदोलन करण्याची ही पद्धत योग्य नसून बेकायदेशीर असल्याचेही आयुक्तांनी आंदोलकांना बजावले.
शुक्रवारी (दि.२८) आयुक्त शंकर गोरे व उपायुक्त यशवंत डांगे यांच्यासह आंदोलकांची बैठक झाली होती. दुकाने उघडी करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, संध्याकाळी बैठक होऊनही लेखी पत्र न मिळाल्याने आंदोलन करण्यात आले.
आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर आंदोलकांनी महापालिकेत जाऊन आस्थापना प्रमुख अशोक साबळे यांच्याकडून लेखी पत्र घेतले. या पत्रात एक जूनच्या राज्य सरकारच्या निर्णयानुसार भाजीपाला, किराणा, फळे विक्रीप्रश्नी निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शाकीर शेख म्हणाले, महापालिकेच्या फतव्याचा गैरफायदा घेऊन अनेक किराणा दुकानदार मालाची चढ्या भावाने विक्री करून काळाबाजार करीत आहेत. आयुक्तांनी बैठक घेऊन शहरातील किराणा दुकाने, फळे व भाजीपाला विक्रीवर असलेल्या निर्बंधांबाबत २८ मे रोजी निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी आश्वासन पाळले नसल्याने नगरकरांची फसवणूक झाली आहे.
संजय झिंजे यांनी कोरोना रुग्ण, वृद्ध, लहान व गरोदर महिलांना फळे, भाजीपाला व सुकामेवा या खाद्यपदार्थांची आवश्यकता असते. मात्र, या सर्व गोष्टींवर निर्बंध घालण्यात आल्याने सर्वसामान्यांना हे खाद्यपदार्थ मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. एक महिना अत्यावश्यक वस्तूंवर सरसकट बंदीचा फतवा अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात दारूची दुकाने सुरू असून, दारूची सर्रास विक्री सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र, किराणा दुकानांवर निर्बंध लादले जात आहेत. इतर जिल्ह्यांत किराणा, फळे, अंडी, मटन विक्री सुरू आहे. फक्त अहमदनगर शहरातच वेगळ्या पद्धतीने निर्णय घेतले जातात. ते अन्यायकारक आहेत, असे बहिरनाथ वाकळे यांनी सांगितले.
---------
फोटो-
सामाजिक कार्यकर्ते संजय झिंजे, बहिरनाथ वाकळे, शाकीर शेख यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले.