दूध दरवाढीसाठी कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर आंदोलन; ४० रुपये दर देण्याची मागणी
By सचिन धर्मापुरीकर | Published: July 1, 2024 02:54 PM2024-07-01T14:54:45+5:302024-07-01T14:55:36+5:30
कोपरगावच्या जवळके येथे आंदोलन; दुधाला ४० रुपये दर देण्याची मागणी
अहमदनगर : दुधाला किमान ४० रूपये प्रती लिटर दर देण्यात यावा, यासह स्वतंत्र न्यायधीकरणाची स्थापना करून किमान आधारभुत किंमत ठरवून त्याबाबतचा कायदा करावा, अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्यात दुरूस्ती करून जास्तीत जास्त शिक्षेची तरतुद करावी, या मागण्यासाठी कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर जवळके येथे दुध उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी चक्काजाम अंदोलन केले.
पाऊण तास चाललेल्या आंदोलनामुळे कोपरगाव-संगमनेर मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मध्यस्थीने अंदोलन स्थगीत करण्यात आले. त्यानंतर वाहतुक सुरूळीत झाली.
यावेळी बोलताना ॲड. योगेश खालकर म्हणाले की, चाऱ्याचे व पशुखाद्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. सध्या दुधाला मिळत असलेला दर शेतकऱ्यांना परवडत नाही. १५ मार्च २४ च्या शासन निर्णयाची अंबलबजावणी करून ५ जानेवारी २४ पासुनचे शासनाकडे प्रलंबित असलेले प्रती लिटर ५ रूपये अनुदान दुध उत्पादकांनी उत्पादित केलेल्या सर्व दुधास विना निकष सरसगट मिळावे. तसेच खते कीटकनाशके व शेती उपयोगी साहित्यावरील जी. एस. टी. पूर्णपणे माफ करण्यात यावा. दुधाला कमीतकमी ४० रुपये भाव मिळावा, अशी मागणी केली.
ॲड. रमेश गव्हाणे म्हणाले की, शासन दुग्धउत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. दुधापासुन बननाऱ्या वस्तुंना भाव आहे, पण दुधाला भाव नाही हे दुर्दैव आहे. शासनाने दुग्धउत्पादक शेतकऱ्याकडे सकारात्मकतेने पहावे. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध ओतुन निषेध व्यक्त केला. हा रस्ता रोको पाऊण तास चालला. यावेळी लक्ष्मण थोरात, रंगनाथ गव्हाणे, परभत गव्हाणे, विजय गोर्डे, रामनाथ पाडेकर, सुनिल थोरात, रामनाथ गव्हाणे, कैलास गव्हाणे, शैलेश खालकर, रविंद्र कुरकुटे, श्रीहरी थोरात, सुनिल घारे, अशोक नेहे, रविंद्र पाडेकर, भास्कर पाचोरे, बजरंग गव्हाणे आदी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीव्र आंदोलनाचा इशारा
दूध दरवाढी संदर्भातील हे आंदोलन तात्पूरते स्थगीत केले आहे. शासनाने लवकर यावर निर्णय न घेतल्यास पुन्हा तिव्र अंदोलन छेडण्याचा इशाराही ॲड. योगेश खालकर यांनी यावेळी दिला.