शेतक-यांच्या शेतावर बियाणे देणार-कृषिमंत्री दादा भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:13 PM2020-05-23T12:13:50+5:302020-05-23T12:14:39+5:30
महाराष्ट्रात खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने केली आहे. खरीप हंगामासाठी लागणारी खते व बियाणे पुरेशा प्रमाणात आहेत. शेतकरी बांधवांनी कमी लागवड खर्चात जास्तीत जास्त दर्जेदार शेतमालाची निर्मिती करावी. शेतक-यांच्या शेतावर बियाणे उपलब्ध करुन देणार आहोत, असे मत कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले.
राहुरी : महाराष्ट्रात खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने केली आहे. खरीप हंगामासाठी लागणारी खते व बियाणे पुरेशा प्रमाणात आहेत. शेतकरी बांधवांनी कमी लागवड खर्चात जास्तीत जास्त दर्जेदार शेतमालाची निर्मिती करावी. शेतक-यांच्या शेतावर बियाणे उपलब्ध करुन देणार आहोत, असे मत कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात आॅॅनलाईन खरीप पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी परिसंवादाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भुसे बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा होते.
भुसे म्हणाले, गाव शिवारातील ओढे, नदी, नाले यावर बंधारे बांधण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार आहे. भाडेतत्वावर वापरण्यासाठी प्रत्येक गावासाठी ट्रॅक्टर देण्यात येईल. शेततळ्याच्या अस्तरीकरणासंबंधी लवकरच निर्णय घेऊ. येत्या १० दिवसात ऊर्जा विभागाचे नवीन धोरण येत आहे. त्यामध्ये प्रत्येक शेतक-याला सौरपंप पुरविण्यासंबंधी निर्णय घेऊ.
यावेळी डॉ. सुहास दिवसे, विश्वजीत माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या आॅनलाईन खरीप पीक परिसंवादाच्या समारोपाच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. शरद गडाख यांनी केले.
विवेक माने, प्रमोद पाटील या शेतक-यांनी मनोगत व्यक्त केले. दोन दिवसीय परिसंवादात राज्यातून ५०० पेक्षा जास्त शेतकरी, कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विभागातील अधिकारी आॅनलाईन सहभागी झाले होते. समन्वयक म्हणून डॉ. बाबासाहेब माळी, डॉ. सचिन सदाफळ, डॉ. भगवान देशमुख, डॉ. संग्राम काळे व प्रा. अन्सार अत्तार यांनी काम पाहिले़