अगस्ती कारखान्याचा प्रदूषण विरहित इथेनॉल प्रकल्प होणार कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 04:19 PM2020-01-12T16:19:13+5:302020-01-12T16:20:06+5:30
‘भूमिपूजननंतर अवघ्या ११ महिन्यात साखर कारखान्याची उभारणी’ असा विक्रम नावावर असणा-या अगस्ती साखर कारखान्याच्या प्रति दिन ३० किलो लिटर क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाचे काम अवघ्या १० महिन्यात पूर्णत्वास गेले आहे.
हेमंत आवारी ।
अकोले : ‘भूमिपूजननंतर अवघ्या ११ महिन्यात साखर कारखान्याची उभारणी’ असा विक्रम नावावर असणा-या अगस्ती साखर कारखान्याच्या प्रति दिन ३० किलो लिटर क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाचे काम अवघ्या १० महिन्यात पूर्णत्वास गेले आहे. पुढील आठवडाभरात प्रकल्पाची चाचणी घेण्याचा मानस अगस्ती प्रशासनाचा असून ‘शून्य टक्के प्रदूषण’ धरतीवर हा प्रकल्प उभा राहिला आहे.
८ मार्च २०१९ ला अगस्तीच्या आसवणी प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. २०२०च्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील आठ दिवसात प्रकल्पाची चाचणी घेतली जाणार आहे. साधारण ९० लाख लिटर क्षमतेपर्यंतच्या लोखंडी टाक्या उभारण्याचे काम अवघ्या नऊ-दहा महिन्यांमध्ये पूर्णत्वास गेले आहे. उसापासून साखर व मोलासेस अन् मोलासेसपासून दर दिवसाला प्रत्येकी ३० हजार लिटर अल्कोहोल, इथेनॉल व ई.एन.अे. तयार होणार आहे.
दिवसाला तीन लाख लिटर पाणी बाहेर फेकले जाणार आहे. हे पाणी ९० लाख लिटर क्षमतेच्या भल्या मोठ्या लोखंडी टाकीत साठवले जाणार असून या टाकीतून मिळणाºया ‘गॅस’चा उपयोग बॉयलर इंधनासाठी होणार आहे. तर अस्वच्छ पाण्याचे शुध्दीकरण होत हे पाणी पुन्हा असावाणी प्रकल्पासाठी उपयोगी पडणार आहे. तसेच उरणारे वेस्ट सेंद्रिय खत निर्मितीसाठी उपयोगी येणार आहे. परिसरात दुर्गंधी पसरणार नाही.
साधारण पन्नास ते पंच्चावन्न कोटींच्या घरात प्रकल्पाचा खर्च असला तरी प्रकल्प पूर्ण होऊन उत्पादन मिळू लागल्यावर ऊस उत्पादकांना १५० ते २०० रुपये प्रतिटनाला अधिक भाव मिळेल यात शंका नाही.
प्रकल्प उभारणीचे काम करणारी कंपनीच महिनाभर प्रकल्पाची चाचणी घेणार आहे. यंदाच्या गळीत हंगामाच्या ४३ व्या दिवसाअखेर गुरुवारपर्यंत १ लाख ५४ हजार ७८७ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. १ लाख ५८ हजार ८६० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. यंदाचा आतापर्यंतचा सरासरी साखर उतारा १०.२४ इतका आहे.
प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आठ-दहा दिवसात प्रकल्पाची चाचणी घेण्याचा मानस आहे. पूर्ण प्रदूषण मुक्त असा हा प्रकल्प साकारत आहे, असे अगस्ती कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले यांनी सांगितले.