चोंडीतील अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव २६ वर्षांत दुसऱ्यांदा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:16 AM2021-05-31T04:16:42+5:302021-05-31T04:16:42+5:30
जामखेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चोंडी (ता. जामखेड) येथे दरवर्षी साजरा होणारा जयंती ...
जामखेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चोंडी (ता. जामखेड) येथे दरवर्षी साजरा होणारा जयंती महोत्सव रद्द करण्यात आला आहे. गेल्या २६ वर्षांत जयंती महोत्सवाची परंपरा दुसऱ्यांदा खंडित झाली. आमदार गोपीचंद पडळकर चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या काही निवडक समर्थकांसोबत सोमवारी (दि. ३१) येणार आहेत.
अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव म्हणून चोंडी हे गाव राज्यात भाजप-शिवसेना युती सरकार असताना १९९५ मध्ये प्रथमच प्रकाशझोतात आले. २५ ऑगस्ट १९९५ रोजी अहिल्यादेवींच्या २०० व्या पुण्यतिथीनिमित्त राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी चोंडीत उपस्थित राहतानाच विविध विकासकामांना दोन कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. त्या वर्षापासून अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम होऊ लागला. त्या वेळी तत्कालीन मंत्री अण्णा डांगे यांनी याकामी पुढाकार घेत चोंडीचा कायापालट करण्याचे काम केले. दरम्यान, त्या वेळच्या यशवंत सेनेचे सरसेनापती व नंतरच्या काळात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी ३१ मे १९९६ रोजी अहिल्यादेवी होळकरांची पहिली जयंती चोंडीत साजरी केली. जानकर यांनी अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करण्याचा पायंडा सुरू केला. तो आजही चालूच असून जयंतीचे स्वरूप वर्षानुवर्षे वाढत आहे.
दरम्यानच्या काळात २००७ पासून ३१ मे जयंतीनिमित्त चोंडीत येणाऱ्या हजारो भाविकांना भाजपचे तत्कालीन जामखेड तालुकाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी महाप्रसाद व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय सुरू केली ती आजही अखंडित चालू आहे. जानकर यांनी २०१५ नंतर जयंती महोत्सव चोंडीऐवजी मुंबई येथे आझाद मैदानावर साजरा करण्यास प्रारंभ केला. २०१६ पासून जयंती महोत्सवाची धुरा तत्कालीन मंत्री व चोंडीचे सुपुत्र अहिल्यादेवी होळकरांचे माहेरकडील वंशज प्रा. राम शिंदे यांनी सांभाळली आहे.
---
कोरोनामुळे चोंडी येथे होणारा जयंती उत्सव रद्द करण्यात आला आहे. या वर्षी आपण आपल्या घरीच जयंती साजरी करावी. केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
प्रा. राम शिंदे,
माजी मंत्री
---
३० चौंडी