अहमद निजामशाह यांच्या स्मृतिस्थळाची वासलात; कबरीपर्यंत केली जाते शेती

By साहेबराव नरसाळे | Published: September 28, 2017 05:23 PM2017-09-28T17:23:23+5:302017-09-28T17:28:43+5:30

दिल्लीगेटपासून ते अहमदशहा यांच्या कबरीपर्यंतची जमीन ‘बाग-ए-रोजा’ या वास्तूसाठी संरक्षित होती. मात्र, ब्रिटिशांच्या चुकीच्या धोरणामुळे आज या संरक्षित वास्तूची जमीन (इनाम) हस्तांतरित करण्यात आली आहे.

Ahmad Nizamshah's memories; Farming is done till the tomb | अहमद निजामशाह यांच्या स्मृतिस्थळाची वासलात; कबरीपर्यंत केली जाते शेती

अहमद निजामशाह यांच्या स्मृतिस्थळाची वासलात; कबरीपर्यंत केली जाते शेती

ठळक मुद्देबगदाद व कैरो शहरांसारखे वसवले होते अहमदनगरअहमद निजामशाह यांच्या स्मृतीस्थळाची झाली पडझडकमानी ढासळल्या, अहमद निजामशाह यांच्या समाधीस्थळावरील घुमटाला व कमानीला तडे गेले.

साहेबराव नरसाळे
अहमदनगर : बगदाद व कैरो शहरांसारखे नियोजनबद्ध शहर ज्या राजाने वसविले त्या अहमद निजामशाह यांचे स्मृतिस्थळ असलेल्या बाग-ए-रोजा या इतिहासप्रसिद्ध वास्तूची प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व राजकीय इच्छाशक्तीअभावी पूर्णपणे वासलात लागली आहे. अहमद निजामशाह यांच्या समाधीपर्यंत शेती केली जात असून, हा परिसर पूर्णपणे खुरट्या झुडपांनी आणि गवतांनी वेढला आहे.
गॅझेट नोंदीनुसार दिल्लीगेटपासून ते अहमदशहा यांच्या कबरीपर्यंतची जमीन ‘बाग-ए-रोजा’ या वास्तूसाठी संरक्षित होती. मात्र, ब्रिटिशांच्या चुकीच्या धोरणामुळे आज या संरक्षित वास्तूची जमीन (इनाम) हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे थेट अहमदशहा यांच्या कबरीपर्यंत शेती केली जात आहे. अहमदशहा यांच्या कबरीभोवती असलेल्या संरक्षण भिंतीच्या आतमध्येही शेती केली जात आहे़ ज्या राजाने १४९० ते १४९४ या चार वर्षात बगदाद व कैरो या शहरांसाररखी अहमदनगरची रचना केली, त्याच राजाच्या वास्तूची प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे अक्षरश: वाट लागली आहे.
सय्यदअली तबातबाई यांच्या बुरहान-ए- मसिर या ग्रंथात तर फरिस्ता यांच्या गुलशान-ए- इब्राहिमी या ग्रंथातील नोंदीनुसार ‘बाग-ए-रोजा’ ही अहमद निजामशाह यांनी उभी केलेली एक सुंदर गुलाबाची बाग होती़ या बागेभोवती तटबंदी होती़ शाही, प्रसन्न व प्रशस्त असलेल्या या वास्तूवर कुराणातील अनेक कलमे कोरलेली आहेत़ या वास्तूचे बांधकाम प्रमाणबद्ध असून, त्यावरील कोरीव काम शिल्पकलेचा उत्तम नमुना मानला जातो़ कोरलेल्या अनेक भौमितीक आकृत्या हेही एक या कामाचे विशेष आहे़ भुईकोट किल्ल्यामधून थेट बागरोजापर्यंत भुयारी मार्ग होता़ अशा या इतिहास प्रसिद्ध वास्तूचे बांधकाम १५०८ ते १५०९ मध्ये झाल्याची नोंद ‘अहमदनगरची निजामशाही’ या पुस्तकात आहे़ अहमद निजामशाह यांचे संपूर्ण चरित्र कोठेच उपलब्ध नाही़ त्यामुळे त्यांच्याविषयी निश्चित माहिती उपलब्ध होत नाही़ तथापि, ‘बुरहान-ए-मासिर’ या पर्शियन ग्रंथात अहमद निजामशाह यांच्याविषयी माहिती मिळते़ हा ग्रंथ चार खंडात असून, त्यातील एका खंडाचा इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहे़ या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद म्हणजेच ‘अहमदनगरची निजामशाही’ हा ग्रंथ होय़ त्यात अहमदनगरच्या स्थापनेविषयी माहिती आहे.
‘बाग-ए-रोजा’ या वास्तूकडे जाण्यासाठी पूर्वी वारुळाचा मारुती मंदिराकडून रस्ता होता. मात्र, आता हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बाग-ए-रोजा या वास्तूकडे जाण्यासाठी रस्ताच उरला नाही. साताळकर हॉस्पिटलकडून एक छोटासा रस्ता आहे, मात्र, हा रस्ता पावसाळ्यात पूर्णपणे बंद होतो. त्यामुळे अहमदनगरची स्थापना करणा-या अहमद निजामशाह यांच्या समाधीस्थळाकडे जाण्यासाठी किमान रस्ता असावा, अशी अनेक इतिहासपे्रमींची मागणी आहे.
बाग-ए-रोजाच्या बाहेर जो चबुतरा आहे, तो तहलीकोटच्या विजयाचे स्मारक आहे़ मात्र, त्याचीही मोठी दुरवस्था झाली आहे़ कमानी ढासळल्या आहेत. अहमद निजामशाह यांच्या समाधीस्थळावरील घुमटाला व कमानीला तडे गेले आहेत.
हे करता येईल...
अहमद निजामशाह यांच्या लढायांचे, त्यांच्या कर्तृत्वाची माहिती तसेच त्यांच्या दूरदृष्टीतून वसविलेल्या अहमदनगर शहराच्या तत्कालीन नगररचनेची माहिती असलेले संग्रहालय ‘बाग-ए-रोजा’मध्ये उभारणे गरजेचे आहे़ त्यामुळे अहमद निजामशाह यांच्याबाबत लोकांना माहिती मिळेल़ पर्यटन वाढेल़ ‘बाग-ए-रोजा’ म्हणजे गुलाबाची सुंदर, प्रशस्त बाग़ पण ही बाग काळाच्या पडद्याआड गेली आहे़ ती पुनरुज्जीवित करणे शक्य आहे़ या वास्तूवर कोरलेला संदेश भाषांतरीत करुन तेथे लावता येईल़ अहमदनगरच्या तेरा शाही, पहिल्या फारशी विद्यापीठाचे कुलगुरु, मुस्लिम पंचमंडळ अशी अनेकविध माहिती पर्यटकांसाठी येथे उपलब्ध करता येईल़
.............
बाग-ए-रोजामधील जमिनी इनाम दिलेल्या असल्यामुळे तेथे लोकं राहतात, शेती करतात़ संरक्षण भिंतीच्या आतमध्येही शेती केली जाते़ या जमिनी वर्ग झालेल्या आहेत़ त्यामुळे तेथे काहीही विकास करता येत नाही़ तेथे वाढलेले गवत काढण्याचे काम सुरु आहे़ त्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली आहे़ डोमवर वाढलेले गवत पावसाळा संपल्यानंतर काढण्यात येईल़
-एम़ पी़ पवार, उपमंडळ अधिकारी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग

 

Web Title: Ahmad Nizamshah's memories; Farming is done till the tomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.