अहमदनगरमध्ये पुन्हा दोन जण कोरोनाबाधित; कोरोनाची बाधितांचा आकडा ३१ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 05:54 PM2020-04-20T17:54:14+5:302020-04-20T17:56:09+5:30
जामखेड येथील काही दिवसांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. आता त्या मयत व्यक्तीच्या दोन मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला आहे.
अहमदनगर : जामखेड येथील काही दिवसांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. आता त्या मयत व्यक्तीच्या दोन मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला आहे.
जामखेड येथे कोरोनाचे ६ रुग्ण आढळल्याने तेथे हॉटस्पॉट केंद्र घोषित करण्यात आले असून, त्याची मुदत १ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. आता पुन्हा दोघेजण कोरोनाबाधित आढळल्याने जामखेडमधील प्रशासकीय यंत्रणेपुढील आव्हाने वाढली आहेत. काही दिवसांपूर्वीच जामखेड येथील एका मयत व्यक्तीलाही कारोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे जामखेडमधील कोरोनाबाधितांचा आकडा ७ वर पोहोचला होता. त्या मयत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांचीच प्रशासनाने कोरोना टेस्ट केली होती. त्यात मयत व्यक्तीच्या २९ आणि ३६ वर्षीय मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जामखेडमधील कोरोना बाधितांचा आकडा ९ वर तर नगर जिल्ह्यातील कोरोनाची बाधितांचा आकडा ३१ वर पोहोचला आहे.
दरम्यान एकूण बाधितांपैकी १८ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ कोरोनातून मुक्त झालेल्यांमध्ये ३ परदेशी व २ परप्रांतीय नागरिकांचा समावेश असल्याचे प्रशासनाने सांगितले.