नगर रुग्णालय अग्निकांड; शल्य चिकित्सक निलंबित, अन्य ५ जणांवरही कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 07:10 AM2021-11-09T07:10:25+5:302021-11-09T07:10:54+5:30

रविवारी आरोग्यमंत्री राजेश  टोपे यांनी जिल्हा रुग्णालयाची  पाहणी केली तसेच घटनेची सर्व माहिती घेतली. 

Ahmadnagar hospital fire; Surgeon suspended, action taken against 5 others | नगर रुग्णालय अग्निकांड; शल्य चिकित्सक निलंबित, अन्य ५ जणांवरही कारवाईचा बडगा

नगर रुग्णालय अग्निकांड; शल्य चिकित्सक निलंबित, अन्य ५ जणांवरही कारवाईचा बडगा

मुंबई/अहमदनगर : नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून ११ कोरोना रुग्णांचा बळी गेल्याच्या दुर्घटनेस जबाबदार असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, दोन वैद्यकीय अधिकारी व एक स्टाफ नर्स यांना निलंबित करण्यात आले आहे. इतर दोन स्टाफ नर्सची सेवा समाप्त करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी ट्विटद्वारे ही माहिती दिली. हे प्रकरण लोकमतने लावून धरले होते आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. 

रविवारी आरोग्यमंत्री राजेश  टोपे यांनी जिल्हा रुग्णालयाची  पाहणी केली तसेच घटनेची सर्व माहिती घेतली.  टोपे यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्याविरोधात तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. मात्र संपूर्ण माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्येही आमदारांनी डॉ. पोखरणा यांच्याविरोधात रोष व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला होता. या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. 

यांच्यावर कारवाई

निलंबित : डॉ. सुनील पोखरणा (जिल्हा शल्यचिकित्सक), डॉ. सुरेश ढाकणे (वैद्यकीय अधिकारी), 
डॉ. विशाखा शिंदे (वैद्यकीय अधिकारी), सपना पठारे (स्टाफ नर्स)
सेवा समाप्त : आस्मा शेख (स्टाफ नर्स), चन्ना अनंत (स्टाफ नर्स)

Web Title: Ahmadnagar hospital fire; Surgeon suspended, action taken against 5 others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.