अहमदनगर, शिर्डीची मोजणी १६८ टेबलवर : लोकसभेचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 11:33 AM2019-05-14T11:33:06+5:302019-05-14T11:33:49+5:30
नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी होणार असून याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे.
अहमदनगर : नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी होणार असून याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. यासाठी सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. सकाळी आठ पासून मोजणीस प्रारंभ होणार असून दुपारपर्यंत ईव्हीएमची मतमोजणी पूर्ण होऊन चित्र स्पष्ट होईल, मात्र त्यानंतर काही व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या व टपाली मतदान मोजण्यास वेळ लागणार असल्याने अधिकृत निकाल सायंकाळी सात वाजेपर्यंत जाहीर होऊ शकतो.
जिल्हा प्रशासनाने नगर व शिर्डी अशा दोन्ही मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. एमआयडीसीतील राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी होणार आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा सज्ज झाला असून दोन टप्प्यात या कर्मचाºयांना मतमोजणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यातील पहिले प्रशिक्षण १४ मे रोजी होणार आहे. त्यानंतर २२ मे रोजी मतमोजणीची रंगीत तालीमच गोडाऊनमध्ये होणार आहे. नगर मतदारसंघात २०३० मतदान केंद्रांवर ६४.२६ टक्के, तर शिर्डीत १७१० मतदान केंद्रावर ६४.५४ टक्के मतदान झालेले आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एका कक्षाची उभारणी करण्यात आली असून, त्यात प्रत्येकी १४ टेबल असतील. त्यानुसार साधारण २२ ते २५ फेºयांत मोजणी होणार आहे.
एका फेरीसाठी १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागणार असून, प्रत्येक फेरीनिहाय उमेदवारांना पडलेली मते जाहीर होतील. साधारण दुपारी एक वाजेपर्यंत फेºया संपून निकालाचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर टपाली व काही व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजणीस वेळ लागणार असल्याने सायंकाळी सातपर्यंत अंतिम निकाल हाती येऊ शकतो.
जिल्ह्यात ६० व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजणार
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजल्या जाणार आहेत. जिल्ह्यात १२ विधानसभा मतदारसंघ असल्याने ६० व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजल्या जातील. याशिवाय नगर मतदारसंघातून १३ हजार १७८ टपाली व ७ हजार १४८ ईटीपीबीएस (आॅनलाईन मतपत्रिका) मतपत्रिका पाठविल्या होत्या. त्यातील ४ हजार ९७९ टपाली, तर ३ हजार ७९४ ईटीपीबीएस मतपत्रिका प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. शिर्डी मतदारसंघातूनही ८ हजार ८७० टपाली व २ हजार ७७६ ईटीपीबीएस मतपत्रिका पाठवल्या आहेत. या मतपत्रिका व व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजणीसाठी मोठा कालावधी लागू शकतो. परिणामी निकाल लांबणार आहे.
मतमोजणी स्टाफ (नगर मतदारसंघ)
मतमोजणी कक्ष - ६
मतमोजणी टेबल - ८४
टपाली मोजणी टेबल - १
मतमोजणी पर्यवेक्षक - ८४
मतमोजणी सहायक - ८४
सूक्ष्म निरीक्षक - ८४
आकडेवारी एकत्रिकरण स्टाफ - १२
रो आॅफिसर - ६
शिपाई - १२०
सिलिंग स्टाफ - ३६
माध्यम समन्वयक - १
उपजिल्हाधिकारी - १
अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी - ८
राखीव अधिकारी-कर्मचारी १६१
सीपीएफ स्टाफ - २६
एसआरपीएफ - २६
स्टेट पोलीस स्टाफ- १९