अहमदनगर : श्रीरामपूर तालुक्यात कडकडीत बंद, जिल्हा मुख्यालयाची मागणी
By शिवाजी पवार | Published: June 17, 2023 12:14 PM2023-06-17T12:14:38+5:302023-06-17T12:14:50+5:30
शिर्डीतील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास विरोध
श्रीरामपूर (अहमदनगर) : राज्य सरकारने शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केल्यामुळे त्याविरुद्ध श्रीरामपूर शहर व तालुक्यात शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. नियोजित जिल्हा मुख्यालयासाठी श्रीरामपूर शहर हेच योग्य असल्यामुळे शिर्डीतील कार्यालय श्रीरामपूरला हलवण्याची तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे.
शनिवारच्या बंदमध्ये सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. श्रीरामपूर शहरातील मर्चंट असोसिएशनने बंदमध्ये सहभाग घेतल्यामुळे सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. शहरात सकाळी मोटरसायकल रॅली काढण्यात आली. ग्रामीण भागामध्येही बंद पाळण्यात आला. टाकळीभान, वडाळा महादेव, बेलापूर, उंदिरगाव येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमुळे व्यवहार ठप्प झाले.
गेल्या अनेक वर्षांपासून नगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूरला नवे मुख्यालय करण्याची मागणी आहे. यासाठी वेळोवेळी सरकार दरबारी पाठपुरावा करण्यात आला होता. जिल्हा मुख्यालयासाठी आवश्यक सर्व सरकारी कार्यालय येथे कार्यरत आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय, पासपोर्ट कार्यालय, जिल्हा न्यायालय यांची यापूर्वीच येथे स्थापना केली गेली. त्यामुळे भविष्यातील मुख्यालयाचे ठिकाण म्हणून श्रीरामपूरकडे पाहिले जात होते.
मात्र मंत्रिमंडळांनी नुकतेच शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्याकरिता पाठपुरावा केला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे श्रीरामपूरच्या जिल्हा मुख्यालयाच्या मागणीला धक्का बसला आहे. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातून रोष व्यक्त होत आहे.