राजकीय साठमारीत रूतले अहमदनगर एएमटीचे चाक

By साहेबराव नरसाळे | Published: February 15, 2018 11:52 AM2018-02-15T11:52:01+5:302018-02-15T12:13:41+5:30

शिवाजीनगर येथील एएमटीचे वर्कशॉप.. या वर्कशॉपमध्ये रांगेत बस उभ्या आहेत. सर्व नादुरुस्त. एका बसचे पाठे तुटलेले तर दुस-या बसची चाके निखळलेली.. काहींच्या काचा फोडलेल्या तर काहींचे सीट तोडलेले.. अशी ही सारीच अवकळा..

Ahmednagar AMT stop due to political | राजकीय साठमारीत रूतले अहमदनगर एएमटीचे चाक

राजकीय साठमारीत रूतले अहमदनगर एएमटीचे चाक

ठळक मुद्देमहापालिकेने दरमहिन्याला यशवंत अ‍ॅटोला ५ लाख रुपये देण्याचा निर्णय झाला होता.महापालिकेने यशवंत अ‍ॅटो कंपनीचे मागील १४ महिन्यांचे ७० लाख रुपये महापालिकेकडे थकवले आहेत.८ मार्च रोजी महिलांना मोफत प्रवासाची घोषणा केली होती. या एका दिवसाच्या प्रवासाचे भाडे महापालिका देणार होती. मात्र, या एका दिवसाचे ७४ हजार रुपयेही महापालिकेने ठेकेदाराला अद्याप दिलेले नाहीत.

साहेबराव नरसाळे, नवनाथ खराडे
अहमदनगर :
दृष्य पहिले : दुपारचे अडीच वाजलेले.. माळीवाडा बसस्टँण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर असलेला शहर बससेवेचा थांबा रिक्षांनी वेढलेला.. या रिक्षाचालकांना ना प्रशासनाची भीती, ना पोलिसांची.. एएमटीचा थेट रस्ताच त्यांनी अडवून धरलाय..
दृष्य दुसरे : शिवाजीनगर येथील एएमटीचे वर्कशॉप.. या वर्कशॉपमध्ये रांगेत बस उभ्या आहेत. सर्व नादुरुस्त. एका बसचे पाठे तुटलेले तर दुस-या बसची चाके निखळलेली.. काहींच्या काचा फोडलेल्या तर काहींचे सीट तोडलेले.. अशी ही सारीच अवकळा..
दृष्य तिसरे : शहर बससेवेचे कार्यालय. या कार्यालयात संचालक धनंजय गाडे, व्यवस्थापक आणि काही कर्मचारी बसलेले. काही कर्मचा-यांचे पगार थकलेत, गाड्या दुरुस्त करायच्या आहेत. डिझेलचा खर्च वाढतोय. महापालिकेने ७० लाख रुपये थकवलेत... आता कसं करायचं, या विचाराने त्यांना ग्रासलेय..


शहर बससेवा मोडकळीस आल्याची ही तीन दृष्ये ‘लोकमत’ने बुधवारी टिपली. एकीकडे रिक्षाचालकांकडून प्रवाशांची होत असलेली लूट आणि दुसरीकडे शहराची लाईफलाईन असलेली एएमटीच अखेरच्या आचक्या देऊ लागली आहे. मात्र, शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी, शहरातील प्रवास सुखकर व्हावा, यासाठी राजकारणीही खंबीर भूमिका घेत नाहीत अन् महापालिका, पोलीस, वाहतूक शाखा, आरटीओ प्रशासनाकडूनही कारवाई होत नाही.
बुधवारी दुपारी तीन वाजता विखे कॉलेजला जाणा-या एएमटी बसमधून आम्ही प्रवास करतोय. माळीवाडा बसस्टँडच्या गेटसमोर एएमटी बस आली अन् चालकाने कर्रर्रकन् ब्रेक दाबला. समोर पाहिले तर सुमारे दहा-पंधरा रिक्षाचालकांनी रस्ता अडवलेला. बसस्थानकावरील प्रवासी आपल्याच रिक्षात बसावेत यासाठी त्यांच्यातही चढाओढ रंगलेली. ‘चला एमआयडीसी.. एमआयडीसी’ म्हणून जो-तो प्रवासी धरुन-धरुन रिक्षात बसवत होता. रिक्षाचालकांच्या या मुजोरीने एएमटी बस पाच मिनिटे रोखून धरली. अखेर एएमटी बसचालकानेच राँग साईडने बस मार्गस्थ करीत रिक्षांच्या विळख्यातून सुटका करवून घेतली. माळीवाडा चौकात आल्यानंतर तिथेही पुन्हा अशीच परिस्थिती. बसला टर्नही घेता येईना, अशी येथील वाहतूक व्यवस्थेची विदारक अवस्था.

एएमटीची सद्यस्थिती

एकूण बसेस - २१, चालू बसेस- १५
मेंटेनन्स खर्च - ६ ते ७ लाख (महिना)
कर्मचा-यांचे पगार- ५ लाख (महिना)
रोजची प्रवासी संख्या- ५ हजार
डिझेल खर्च - १४ लाख (प्रतिमहिना)
वर्कशॉपचे भाडे- ५० हजार (महिना)

या मार्गांवरुन धावतात बस

शहर बससेवा सकाळी पावणेसहा वाजल्यापासून सुरु होते. रात्री साडेदहा वाजेपर्यंत बसेस सुरु असतात. दररोज सुमारे पाच हजार प्रवाशी शहर बससेवेचा लाभ घेतात. साडेचार हजार पासधारक प्रवासी आहेत. निंबळक-विळदघाट, पाईपलाईन रोड, निर्मलनगर, औरंगाबाद रोड, व्हीआरडीई या मार्गावरुन सध्या एएमटीच्या बसेस धावत आहेत. केडगाव व आलमगीर मार्गावर धावणा-या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. एका महिन्यापूर्वी आलमगीर येथे एएमटी बसचालकाला रिक्षा चालकाकडून दमबाजी करण्यात आली होती. त्यामुळे तिकडे बस नेण्यास चालक तयार नसतात.

महापालिकेने थकविले ७० लाख

महापालिकेने शहर बससेवा चालविण्याचा ठेका यशवंत अ‍ॅटो या कंपनीला दिलेला आहे. करारानुसार महापालिकेने दरमहिन्याला यशवंत अ‍ॅटोला ५ लाख रुपये देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यापासून महापालिकेने यशवंत अ‍ॅटो कंपनीचे १४ महिन्यांचे देणे थकविले आहे. मागील १४ महिन्यांचे ७० लाख रुपये महापालिकेकडे थकले आहेत. त्याशिवाय महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने ८ मार्च रोजी महिलांना मोफत प्रवासाची घोषणा केली होती. या एका दिवसाच्या प्रवासाचे भाडे महापालिका देणार होती. मात्र, या एका दिवसाचे ७४ हजार रुपयेही महापालिकेने ठेकेदाराला अद्याप दिलेले नाहीत.

स्वस्त आणि सुरक्षित प्रवास

रिक्षाचालक माळीवाडा बसस्टँडपासून एमआयडीसीपर्यंत २० रुपये, विळदघाटापर्यंत ३० रुपये आणि विखे कॉलेजमध्ये जाण्यासाठी ४० रुपये आकारतात. मात्र, एएमटीचा प्रवास पाच रुपयांपासून सुरु होतो आणि शेवटच्या थांब्यापर्यंत अवघ्या १५ रुपयात संपतो. माळीवाडा ते थेट विखे कॉलेजपर्यंत एएमटीचे तिकीट फक्त १५ रुपये आहे. मात्र, तेव्हढाच प्रवास रिक्षातून केला तर एएमटीपेक्षा दुपटीने पैसे प्रवाशांना मोजावे लागतात. शिवाय एएमटीचा प्रवास हा सुरक्षित आहे, असे एएमटीमधून प्रवास करणा-या अशपाक शेख या विळदघाटात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्याने सांगितले.

सत्ताधा-यांना शहराचे काहीही देणेघेणे नाही. अनेक समस्या शहराला भेडसावत असताना सत्ताधारी वैयक्तिक कामातच व्यस्त आहेत. आम्ही आमच्या काळात उत्तम पद्धतीने एएमटी सेवा चालवली होती. पण त्यांना ही सेवाच मोडून काढायची आहे.
-संग्राम जगताप, आमदार

शहर बससेवेबाबत गेल्या महिन्यात आयुक्तांशी तीन वेळा चर्चा केली. ही थर्ड क्लास बससेवा का चालविता असा जाब विचारला. नगरकर जनतेच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार सुरु आहे. त्यामुळे संबंधितांचे टेंडर त्वरित रद्द करावे.
-दिलीप गांधी, खासदार

शहर बससेवेचे काम असमाधानकारक आहे. बस सुस्थितीत ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. यासाठी वारंवार सूचना देण्यात आल्या. मात्र काहीही सुधारणा झालेल्या नाहीत. त्यामुळे आर्थिक बाबींचा प्रश्नच उद्भवत नाही़ टेन्डर रद्द करण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे.
-सुरेखा कदम, महापौर

डिझेलचे दर वाढले आहेत़ मेंटेनन्सचा खर्च, कर्मचा-यांचा पगार यावर मोठा खर्च होत आहे. महापालिकेने वेळेच्या वेळेला अनुदानाची रक्कम दिल्यास बस सुस्थितीत ठेवून चांगल्या प्रकारे बससेवा चालू शकेल. आम्ही दहा नवीन बसची नोंदणी केली आहे़पण महापालिका पैसेच देत नाही तर त्या बस कशा आणायच्या?
-धनंजय गाडे, संचालक, यशवंत अ‍ॅटो

सद्यस्थितीत बसची अवस्था खराब झाली आहे. मात्र सर्वसामान्यांसाठी परवडेल, अशी सेवा ते देतात. रिक्षाचालक प्रवाशांचीही अडवणूक करतात. महापालिका प्रशासनाने चांगल्या पध्दतीने बससेवा सुरु राहिल यासाठी प्रयत्न करावेत. पोलीस प्रशासनही रिक्षाचालकांच्या बाबत बघ्याची भूमिका घेत आहे. पोलिसांनाही कारवाई केल्यास एएमटीचा मार्ग सुकर होईल.
-अलका मेहेत्रे, प्रवाशी

बस चालविताना अनेकदा रिक्षा चालक दादागिरी करतात़ चौकाचौकात बसला मोठी कसरत करीत तेथून मार्ग काढावा लागतो़ बसस्थानक चौकात दहा मिनिटे बस रिक्षावाल्यांमुळे अडकून पडते़
-शंकर पठाडे, संजय साठे, चालक/ वाहक

 

Web Title: Ahmednagar AMT stop due to political

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.