अहमदनगर-औरंगाबाद महामार्ग पाण्यासाठी अडविला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 02:47 PM2018-12-03T14:47:12+5:302018-12-03T14:49:16+5:30
पांढरीपूल येथे रास्तारोको,पाणीप्रश्नावर वाहनांच्या दुतर्फा रांगा
नेवासा : नेवासा तालुक्यातील शेतकरी हक्काच्या पाण्यासाठी आक्रमक झाले असून वांबोरी पाईपलाईन चारीतून बंधारे भरून घेण्याची तरतूद असूनही टाळाटाळ केली जात असल्याने आज शेतकऱ्यांनी हक्काच्या पाण्यासाठी सोमवारी अहमदनगर-औंरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल येथे रास्तारोको आंदोलन केले.
वांबोरी पाईपलाईनच्या चारीतून हक्काचे पाणी मिळावे म्हणून १९ नोहेंबरला वांजोळी गावात ४ गावच्या शेतकऱ्यांनी ३ दिवस उपोषणही केले होते, यावेळी मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी १४ तलाव भरून देण्याचे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले होते. तसेच पाणीही सोडले नसल्याने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यावेळी काशिनाथ पागिरे , सुनील वीरकर ,रामनाथ खंडागळे ,भरत गर्जे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना बद्रीनाथ खंडागळे म्हणाले की, आम्ही उपोषण केले त्यावेळेस अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधी यांनी आम्हाला आश्वासन दिले होते परंतु आम्हाला पाणी मिळाले नाही. नगर, पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील तलाव भरून दिले आहेत. परंतु नेवासा तालुक्यातील तलाव का भरून दिले जात नाही आमदार बाळासाहेब मुरकुटे हे फक्त खोटे आश्वासन देत असतात अन्य तालुक्यात तलाव भरत असतांना आमदारांना दिसत नाही का ? पाण्यापासून १४ गावांना वंचित ठेवल आहे. याला आमदार, अधिकारी जबाबदार असून यापुढे मोठे आंदोलन केले जाईल.
वांजोळी, लोहोगाव, मोरेचिंचोरे, धनगरवाडी या गावांचा जनावरांच्या चारा-पाण्यासह, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून वांबोरी पाईपलाईन चारीतून या तलावात पाणी सोडण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. पाईपलाईन चारीतून राहूरी तालुक्यातील प्रस्तावित सर्व तलाव भरल्याकडे या आंदोलकांनी लक्ष वेधले आहे. त्याच बरोबर नगर आणि पाथर्डी तालुक्यातील तलाव यातून भरण्याचे काम चालू असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. दुष्काळ परिस्थिती असल्याने पशुधन विकून उदरनिर्वाह करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. वांबोरी चारीवरील इतर तालुक्यात तलाव भरले जातात, मग नेवासा तालुक्यातील का नाही ? वांबोरी चारीतून पाणी मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ नियोजनामुळे आमच्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप आंदोलनकर्ते करत आहेत.
नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर यांना निवेदन देण्यात आले. चार दिवसात संबंधित सर्व विभागाची बैठक घेतली जाईल, असे आश्वासन नायब तहसीलदार जायकर यांनी दिले. सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.