अहमदनगर-बीड रेल्वेची वेग चाचणी यशस्वी; नारायणडोहो ते सोलापूरवाडी दरम्यान धावली रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 07:30 PM2019-02-25T19:30:17+5:302019-02-25T19:30:46+5:30
अहमदनगर ते बीड रेल्वे मार्गावर सोमवारी यशस्वी वेग चाचणी झाली. यानिमित्त अहमदनगरहून निघालेल्या रेल्वेने मराठवाड्यात पहिल्यांदा प्रवेश केला. नारायणडोहो ते सोलापूरवाडी (जिल्हा बीड) या २३ किलोमीटर अंतराची ही चाचणी यशस्वी ठरली.
योगेश गुंड
केडगाव : चार वर्षांपासून सुरू असलेल्या अहमदनगर ते बीडरेल्वे मार्गावर सोमवारी यशस्वी वेग चाचणी झाली. यानिमित्त अहमदनगरहून निघालेल्या रेल्वेने मराठवाड्यात पहिल्यांदा प्रवेश केला. नारायणडोहो ते सोलापूरवाडी (जिल्हा बीड) या २३ किलोमीटर अंतराची ही चाचणी यशस्वी ठरली.
अहमदनगर व मराठवाड्यास जोडणाऱ्या अहमदनगर-बीड-परळी या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गामुळे अहमदनगर व बीड जिल्ह्याची वाहतूक अधिक सोयीस्कर होणार आहे. २०१७ मध्ये नगर रेल्वेस्थानक ते नगर तालुक्यातील नारायणडोहो या २५ किलोमीटर अंतराची चाचणी यशस्वी झाल्यांनतर नारायणडोहो ते सोलापूरवाडी (ता. आष्टी, जि. बीड) या दुसऱ्या टप्प्यातील २३ कि. मी.अंतराचे काम नुकतेच संपले. या मार्गावरील वेग चाचणीसाठी महिनाभरापासून तयारी सुरू होती.
त्यानुसार या मार्गावरील गावकऱ्यांना दोन दिवसांपासूनच सावध करण्यात आले होते. सोमवारी रेल्वे सुरक्षा आयुक्त ए. के. जैन, मुख्य प्रशासकीय अधिकारी एस.के.तिवारी, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, मंडळ रेल्वे व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा, उपमुख्य अभियंता चंद्रभूषण, कार्यकारी अभियंता व्ही.पी.पैठणकर, अभियंता विद्याधर धांडोरे आदी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या देखरेखीखाली ही चाचणी घेण्यात आली.यावेळी या रेल्वेगाडीने ताशी १२२ कि.मी.अंतर कापत बीड जिल्ह्यातील सोलापूरवाडी गाठली. ही चाचणी यशस्वी झाल्याने सर्व वरिष्ठ अधिकाºयांनी जल्लोष करीत समाधान व्यक्त केले. या मार्गाचा तिसरा टप्पा सोलापूरवाडीपासून सुरू होणार आहे. उर्वरित कामही वेगाने सुरू असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.