'तो' नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद, आठ दिवसांपासून घालत होता धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 12:24 PM2020-11-05T12:24:45+5:302020-11-05T12:31:06+5:30
बिबट्या सावरगाव हद्दीत सटवाई दर्याच्या वरील पठारावर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. पहाटे तीन वाजेनंतर जेरबंद झालेल्या या बिबट्याने पिंजऱ्यातील बोकडाचा सकाळपर्यंत जवळपास निम्म्याने फडशा पाडला होता.
अहमदनगर - पाथर्डी येथील वन परिक्षेत्राच्या हद्दीत गेल्या आठ दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला गुरुवारी पहाटे यश आले. बिबट्या सावरगाव हद्दीत सटवाई दर्याच्या वरील पठारावर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. पहाटे तीन वाजेनंतर जेरबंद झालेल्या या बिबट्याने पिंजऱ्यातील बोकडाचा सकाळपर्यंत जवळपास निम्म्याने फडशा पाडला होता. या बिबट्याने आठ दिवसात तीन मुलांना ओढून नेले होते. यात त्यांचा मृत्यू झाला होता.
बिबट्या शोध मोहीम कामी अहमदनगर, पुणे, जळगाव, औरंगाबाद, बीडची पथके पाच दिवसांपासून अहोरात्र कार्यरत होती. गुरुवारी पहाटे आष्टी वन परिक्षेत्र हद्दीत भक्ष्याच्या शोधार्थ सावरगाव सटवाई दर्याचे पठारावर बिबट्या आला होता. पिंजऱ्यातील बोकडाचा फडशा पाडतानाच पिंजऱ्याचा दरवाजा बंद होऊन तो जेरबंद झाला.
पाथर्डी/अहमदनगर : 'तो' नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद, आठ दिवसांपासून घालत होता धुमाकूळ pic.twitter.com/NJip0esLei
— Lokmat (@MiLOKMAT) November 5, 2020
शिरापूर डोंगराच्या माथ्यावर सावरगाव (ता. आष्टी) वन विभागाची हद्द आहे. शिरापूर, पानतासवाडी, करडवाडी, सटवाईदरा ओढा, गाढवदरा परिसरात बिबट्या गेल्या अनेक दिवसांपासून वावरत होता. दरम्यानच्या काळात त्याने गर्भगिरीतील अनेक रानडुकरांचा फडशा पाडला. भक्ष्याची वानवा झाल्याने तो मानवी वस्त्याकडे वळला होता.