अहमदनगर शहर : आमदारांच्या वचनांचे ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:39 PM2019-08-24T12:39:09+5:302019-08-24T13:25:36+5:30
मतदारसंघात शहर सुधारित पाणीपुरवठा व अमृत योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या भुयारी गटार योजनेमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
अहमदनगर : मतदारसंघात शहर सुधारित पाणीपुरवठा व अमृत योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या भुयारी गटार योजनेमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरासह उपनगरांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. मागील निवडणुकीत अंतर्गत रस्त्यांचे दिलेले आश्वासन पूर्ण झालेले नाही़ वाडियापार्क क्रीडासंकुलाचा मुद्दा अद्यापही प्रलंबित आहे. तसेच शहरातील मोठी अतिक्रमणे अजूनही तशीच आहेत.
आमदाराचे नाव : संग्राम जगताप
मतदारसंघ : अहमदनगर शहर
टॉप 5 वचनं
1 रोजगार निर्मिती
2 सीना नदी सुशोभिकरण
3 झोपडपट्टीमुक्त नगर
4 विकास आराखड्याप्रमाणे रस्ते विकास
5 कचरा खत प्रकल्प
वचनांचं काय झालं?
1 एमआयडीसीतील बंद आयटी पार्क सुरू
2 सीना सुशोभिकरणाचा प्रस्ताव लालफितीत
3 रामवाडी झोपडपट्टीचा प्रश्न प्रलंबित
4 वाहतुकीचा प्रश्न जैसे थे
5 कचरा विल्हेवाटीची अद्याप प्रतीक्षा
हे घडलंय...
1 बाळासाहेब देशपांडे दवाखान्यात नवीन मशिनरी
2 तपोवन, बोल्हेगाव रस्त्याचे काम मार्गी
3 केडगाव लिंक रोडचे काम पूर्ण
4 सीना नदी पात्राचे रुंदीकरण
5 प्रमुख चौकांत हायमास्टचा प्रकाश
हे बिघडलंय...
1 नगर शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था कायम
2 भूसंपादनामुळे तपोवन रस्त्याच्या कामात अडचणी
3 उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरू नाही
4 नाट्यगृहाचे भिजत घोंगडे कायम
विधीमंडळातील कामगिरी
संग्राम जगताप सांगतात, अधिवेशनात गेल्या पाच वर्षांत अनेक प्रश्न उपस्थित केले. सीना नदीपात्राचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नदी पात्रातील अतिक्रमणे काढून पात्र रुंद केले. उड्डाणपुलाचा प्रश्न वेळोवेळी उपस्थित केला. या कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर कार्यवाही सुरू आहे.विद्यापीठाचे उपकेंद्र कार्यान्वित करण्याची मागणी आपण सभागृहात वारंवार केली आहे.
एमआयडीसीतील बंद पडलेला आयटी पार्क सुरू करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पण ते शक्य झाले नाही. आमदार संग्राम जगताप यांनी बंद पडलेला आयटी पार्क सुरू केला. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नवीन उद्योगांकरीता जागा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. - अशोक सोनवणे, संस्थापक , आमी संघटना, नागापूर
गेल्या पाच वर्षात रस्त्यांची कामे चांगली झाली आहेत. बंद पडलेला आयटी पार्क सुरू झाला. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होत आहे. नगर- पुणे रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. ही रेल्वे सुरू झाल्यास नगरचा विकास आपोआप होईल. - प्रा. बी. एन. शिंदे
का सुटले नाहीत प्रश्न?
केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असल्याने निधी मिळविण्यात अडचणी आल्या. झोपडपट्टी मुक्त शहरासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. रामवाडी झोपडपट्टीचा प्रश्न केंद्राशी संबंधित असल्याने तो सुटला नाही. सीना नदी सुशोभिकरणाच्या दृष्टीने पात्र रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले. सुशोभिकरणाचा प्रस्ताव तयार करून तो शासनाला सादर करण्यात आला आहे. उड्डाणपुलाच्या कामासाठी वेळोवेळी आंदोलने केली. या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे, असे जगताप यांनी सांगितले.
1 मूलभूत सेवा सुविधा योजनेंतर्गत मंजूर झालेला १० कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त.
2 शहर स्वच्छतेसाठी शासनाकडून मिळालेला
3 - २७ कोटींचा निधी महापालिकेत पडून आहे.
2019 मध्ये शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामाला वेळोवेळी मुदतवाढ दिली गेली. मात्र पाणी योजनेचे काम पूर्ण झालेले नाही.
पाच वर्षांत काय केलं?
मागील पाच वर्षात मतदारसंघात बुरुडगाव, केडगाव लिंक रोड, सीना नदी पात्राचे रुंदीकरण, यासारखी कामे करण्यात आली. तसेच तपोवन रस्ता, बोल्हेगाव रस्त्याचे काम मार्गी लावले. तरुणांना रोजगारासाठी इतर शहरांत जावे लागते. त्यांना नगर शहरातच रोजगार मिळावा यासाठी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो़ त्याला यश आले. नागापूर औद्योगिक वसाहतीतील बंद असलेला आयटी पार्क सुरू करण्यात आला असून, रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
मतदारसंघातील रस्त्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून २० कोटी रुपयांचा निधी पाच वर्षांत आणला. याशिवाय आमदार स्थानिक विकास निधीतून रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून, प्रमुख चौकांत हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र तरीही अनेक ठिकाणी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी नागरिकांना आजही चिखलातून प्रवास करावा लागत आहे.
मतदार संघाला काय हवं
उद्योगांसाठी पोषक वातावरण
तरुणांना हव्यात रोजगाराच्या संधी
नियमित कच-याचे संकलन
हद्दवाढीतील उपनगरांत पायाभूत सुविधा
सुरक्षित वाहतूक व्यवस्था
त्यांना काय वाटतं?
मतदारसंघात मोठ्याप्रमाणात विकास कामे केली़ औरंगाबाद- मनमाड रस्त्याला जोडणाºया तपोवन रस्त्याचे काम गेल्या २५ वर्षांपासून रखडले होते़ शासनाकडे पाठपुरावा करून हे काम मार्गी लावले़ पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांपैकी रोजगार उपलब्ध करून देण्याचे एक आश्वासन दिलेले होते़ त्यासाठी गेल्या १९ वर्षांपासून बंद असलेला आयटी पार्क सुरू केला़ पहिल्या टप्प्यात ७ ते ८ आयटी कंपन्या नगरमध्ये आल्या आहेत़ इतरही काही कंपन्यांशी चर्चा सुरू आहे़ - संग्राम जगताप, आमदार