अहमदनगर शहर सहकारी बँक बोगस कर्ज प्रकरण, डॉ.निलेश शेळकेचा जामीन खंडपीठाने फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 06:45 PM2019-12-20T18:45:34+5:302019-12-20T18:46:45+5:30
अहमदनगर शहर सहकारी बँकेत वैद्यकीय साधनसामुग्रीसाठी बोगस कर्ज घेतल्याप्रकरणी डॉ. निलेश शेळके याचा जामीन अर्ज गुरूवारी औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला.
अहमदनगर : अहमदनगर शहर सहकारी बँकेत वैद्यकीय साधनसामुग्रीसाठी बोगस कर्ज घेतल्याप्रकरणी डॉ. निलेश शेळके याचा जामीन अर्ज गुरूवारी औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला.
नगरमध्ये एम्स हॉस्पिटलची उभारणी करताना डॉ. निलेश शेळके याने अनेक डॉक्टरांचा विश्वास संपादन करून त्यांना हॉस्पिटलमध्ये भागीदार करून घेतले. त्यानंतर शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला हाताशी धरून संबंधित डॉक्टरांच्या नावाने कर्ज प्रकरण करून घेत त्या रकमेचा अपहार केला. याप्रकरणी प्रत्येकी ५ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद डॉ. रोहिणी सिनारे, उज्ज्वला कवडे, डॉ. विनोद श्रीखंडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात वर्षभरापूर्वी दिलेली आहे.
या फिर्यादीनुसार डॉ. निलेश शेळके याच्यासह शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळ व अधिकाºयांविरुद्ध फसवणूक व आर्थिक अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू आहे.
दरम्यान, डॉ. शेळके याने जिल्हा न्यायालयात याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तिथे जामीन फेटाळला. यानंतर डॉ. शेळके याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी धाव घेतली. गुरूवारी या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने शेळके याचा जामीन अर्ज फेटाळला. फिर्यादींच्या वतीने अॅड. नारायण नरवडे यांनी काम पाहिले.