अहमदनगर शहरात राष्ट्रवादी की सेना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:21 PM2019-10-15T12:21:43+5:302019-10-15T12:22:50+5:30

नगर शहर विधानसभा मतदासंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात थेट सामना रंगला आहे़ सेनेचा बालेकिल्ला असलेल्या नगर शहरावर गतवेळी राष्ट्रवादीने झेंडा रोवला. याहीवेळी जगताप जोरदार तयारीने उतरले आहेत. ते झेंडा कायम ठेवणार की शिवसेनेचे अनिल राठोड परत विधानसभेत पोहोचणार याची उत्सुकता आहे. 

In Ahmednagar city Nation 1 Plaintiff or army? | अहमदनगर शहरात राष्ट्रवादी की सेना?

अहमदनगर शहरात राष्ट्रवादी की सेना?

वार्तापत्र - अण्णा नवथर 
नगर शहर विधानसभा मतदासंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात थेट सामना रंगला आहे़ सेनेचा बालेकिल्ला असलेल्या नगर शहरावर गतवेळी राष्ट्रवादीने झेंडा रोवला. याहीवेळी जगताप जोरदार तयारीने उतरले आहेत. ते झेंडा कायम ठेवणार की शिवसेनेचे अनिल राठोड परत विधानसभेत पोहोचणार याची उत्सुकता आहे. 
 गत विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले़ चौरंगी लढतीत राष्ट्रवादीचे जगताप विजयी झाले़  यावेळी आघाडी व युतीने एकास एक उमेदवार दिले आहेत़ जगताप यांच्या रुपाने राष्ट्रवादीने पुन्हा तरुण चेहरा दिला. सेनेत यावेळी अनेकजण इच्छूक होते. पण, पक्षश्रेष्ठींनी राठोड यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. आमदार जगताप यांनी विकासासाठी ‘वन्स मोअर’, असा नारा दिला आहे़ सेनेचे राठोड हे पुन्हा भयमुक्तीचा नारा देताना दिसतात़ जगताप हे तरुणांची फौज सोबत घेऊन प्रचारात उतरले आहेत़ आयटीपार्क सुरू केल्याने शहरात तरुणांना रोजगार मिळाल्याची भूमिका ते मांडत आहेत. या तरुणांना सोबत घेऊनच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचा होम टू होम प्रचारावर भर आहे़ दोन्ही कॉंग्रेसचे नगरसेवकही त्यांच्यासाठी घरोघर जाऊन प्रचार करत आहेत. जाहीर प्रचारापेक्षा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून प्रचार करणे ही जगताप यांची कार्यपद्धती आहे. याहीवेळी त्यांनी ती पद्धत अवलंबली आहे. 
महापालिकेच्या निवडणुकीत सेना-भाजपने शहरात मोठी वातावरण निर्मिती केली होती. मात्र, जगताप यांनी एकट्याने मुकाबला करत लक्षवेधी जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे त्यांची रणनिती लक्षात येत नाही. 
सेना-भाजप एकत्रित लढत असल्याने सेनेला मोठ्या आशा आहेत. राठोड यांची भिस्त आपल्या पारंपरिक मतांवर आहे़ त्यांच्याकडेही कार्यकर्त्यांचे जाळे आहे. मात्र, सेना-भाजपमध्ये एकवाक्यतेचा अभाव आहे. भाजपाचे माजी खासदार दिलीप गांधी व त्यांचे समर्थक असलेले नगरसेवक अजूनही प्रचारात सक्रिय नाहीत़ राष्ट्रवादीचे माजी आमदार दादा कळमकर हे आजवर जगताप यांच्या पाठीशी असत़ ते यावेळी प्रचारात दिसत नाहीत़ कळमकर यांचे पुतणे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवबंधन बांधले़ राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले किरण काळे वंचित, संतोष वाकळे मनसे, तर एमआयएमकडून नगरसेवक अल्ताफ शेख, भाकपकडून बहिरनाथ वाकळे हे रिंगणात आहेत. बसपाकडून श्रीपाद छिंदमही उमेदवारी करत आहेत. हे उमेदवार कोणाला फटका देणार यावर लढतीचे चित्र अवलंबून आहे. 
प्रचारातील मुद्दे 
एमआयडीसीतील बंद पडलेला आयटीपार्क सुरू करून तरुणांच्या हाताला काम दिले आहे़ यापुढील काळात आयटीपार्कमध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावा संग्राम जगताप यांच्याकडून केला जात आहे़ आपण निधी आणतो मात्र, सेना कामे बंद पाडण्याचा उद्योग करते, असाही आरोप जगताप हे विविध सभांमधून करत आहेत. 
गेल्या पाच वर्षांत व्यापारी आणि उद्योगासाठी पोषक वातावरण तयार केले. शहरात एकही जातीय व धार्मिक तंटा झालेला नाही हाही राष्ट्रवादीच्या प्रचाराचा मुद्दा आहे़ केडगाव हत्याकांडात राठोड यांनी कसे राजकारण केले हेही जगताप सभांमधून सांगत आहेत. 
दहशत मुक्त नगर, गुंडगिरी आणि केडगाव हत्याकांड हे जुने मुद्दे शिवसेना प्रचारात पुन्हा मांडत आहे. शहरात नवीन उद्योग आणू, असेही आश्वासन सेना देत आहे. 

Web Title: In Ahmednagar city Nation 1 Plaintiff or army?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.