अहमदनगर राष्ट्रीय सेवा योजनेचे उगमस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 10:40 AM2019-10-02T10:40:06+5:302019-10-02T10:40:40+5:30
‘समाजसेवेतून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास’ हे अंतिम ध्येय ठेवून २ आॅक्टोबर १९६९ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेस प्रारंभ झाला. आज देशभरातील महाविद्यालयांत ही योजना राबवली जाते. या महत्त्वाच्या योजनेचे उगमस्थान अहमदनगर महाविद्यालय आहे, ही नगरसाठी कौतुकास्पद बाब आहे.
राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन विशेष
‘समाजसेवेतून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास’ हे अंतिम ध्येय ठेवून २ आॅक्टोबर १९६९ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेस प्रारंभ झाला. आज देशभरातील महाविद्यालयांत ही योजना राबवली जाते. या महत्त्वाच्या योजनेचे उगमस्थान अहमदनगरमहाविद्यालय आहे, ही नगरसाठी कौतुकास्पद बाब आहे.
डॉ. भास्कर पांडुरंग हिवाळे यांनी समाजसेवेसाठी शिक्षणाचा मार्ग अवलंबून २० जून १९४७ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय सुरू केले. डॉ.हिवाळे यांचे निधन (७ सप्टेंबर १९६१) झाल्यानंतर महाविद्यालयाच्या कारभारासाठी व डॉ. हिवाळे यांचे योगदान व स्मृतीप्रीत्यर्थ ‘भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेची स्थापना १४ एप्रिल १९६९ ला झाली. यास ५० वर्ष पूर्ण होत आहेत. येथूनच सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेसही (एनएसएस) २ आॅक्टोबर २०१९ ला पन्नास वर्षे होत आहेत.
महाविद्यालयीन उच्चशिक्षित तरुण-तरुणी व प्राध्यापकांच्या ज्ञान, अनुभव व ऊर्जेचा सदुपयोग सामाजिक विकासाकरिता व्हावा या उद्देशाने डॉ. हिवाळे यांनी १९५३ साली ग्रामसुधारणेसाठी नागरदेवळे गाव दत्तक घेतले. विकास कामांच्या चळवळीतून १९६१ मध्ये महाविद्यालयात ग्रामीण विकास अध्ययन केंद्र स्थापन झाले. पुढे १९६१-६२ मध्ये तत्कालीन प्राचार्य डॉ. थॉमस बार्नबस (टी सर) यांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. एस. के. हळबे व सहका-यांनी ‘ग्रामीण जीवन विकास प्रकल्प’ सुरू केला. कोल्हेवाडी, टाकळी काझी, मदडगाव आदी गावांत विविध गावसुधारणा कार्यक्रम राबविण्यात आले. जीवनाचे वास्तव स्वरुप विद्यार्थ्यांनी समजावून घ्यावे तसेच ग्रामीण समाजात काम करण्याची संधी मिळावी, गावपातळीच्या काही समस्यांचे निराकरण महाविद्यालयीन तरुण-तरुणींकडून व्हावे, असा व्यापक उद्देश या योजनेमागे होता.
भारत सरकारच्या संस्कृती युवा कार्य व क्रीडा मंत्रालयामार्फत, राज्य शासनाच्या समन्वयाने रा.से.यो. देशभर शिक्षण क्षेत्रासाठी राबवली जाते. केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान दिले जाते. प्रत्येक शैक्षणिक वर्षात एन.एस.एस.चे विद्यार्थी किमान १२० तास सामाजिक सेवा कार्यात व्यतीत करतात. तसेच वार्षिक हिवाळी शिबिर ८ ते १० दिवसांचे घेण्यात येते. यात समाजसेवा कार्य, प्रबोधन, व्याख्याने, पर्यावरण-विकास, प्रौढ शिक्षण, आरोग्य शिक्षण, परिसर विकास, सांस्कृतिक कार्यक्रम रक्तदान, श्रमदान, सर्वेक्षण प्रभातफे-या, करमणुकीचे कार्यक्रम आदींचा समावेश विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व प्रतिभेला वाव देण्यासाठी करण्यात येतो.
अहमदनगर महाविद्यालयात १९६९ पासून योजना राष्ट्रीय स्तरावर सुरू झाल्यापासून योजनेची अंमलबजावणी करणा-या प्राध्यापक, कार्यक्रम अधिका-यांची प्रशिक्षणाची धुरा सांभाळली आहे. आतापर्यंत १० हजारापेक्षा जास्त सहभागी प्राध्यापकांना योजनेसाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रसाठी एकच प्रशिक्षण केंद्र अहमदनगर महाविद्यालयात कार्यरत आहे. प्रारंभीच्या काळात सी.एस.आर.डी. संस्थेद्वारा रा.से.यो. साठी माहिती पुस्तिका प्रकाशित करून मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.
डॉ. भास्कर पांडुरंग हिवाळे यांच्या संकल्पनेनुसार महाविद्यालयातील तरुणांचे उच्च शिक्षणाबरोबर समाजकार्यात योगदान असेच मिळाल्यास, महात्मा गांधींची ‘बळकट राष्ट्रनिर्मिती व ग्रामराज्य’ कल्पना नक्कीच साकारली जाईल.
- प्रा.मेहबूब शेख,
रसायनशास्त्र विभाग, अहमदनगर कॉलेज