नगरमध्ये व्यापाऱ्यावर हल्ला प्रकरण; स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना
By अण्णा नवथर | Published: February 11, 2024 03:15 PM2024-02-11T15:15:57+5:302024-02-11T15:16:47+5:30
Ahmednagar Crime News: अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड परिसरात शनिवारी रात्री एका व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाला. हल्लेखोर घटनेनंतर पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली.
- अण्णा नवथर
अहमदनगर - शहरातील गुलमोहर रोड परिसरात शनिवारी रात्री एका व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाला. हल्लेखोर घटनेनंतर पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली. धीरज मदनलाल जोशी (वय ५४, रा. किर्लोस्कर कॉलनी गुलमोहर रोड ) असे हल्ला झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांचे शहरातील रामचंद्र खुंट येथे बन्सी महाराज, या नावाने मिठाईचे दुकान आहे.
असा आहे घटनाक्रम
धीरज जोशी हे शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास रामचंद्र खुंट येथील दुकान बंद करून घराकडे निघाले होते. ते कुठला डीएसपी चौक तारकपूर प्रोफेसर चौक, गुलमोहर रोड मार्गे किर्लोस्कर वसाहतीत आले. त्यावेळी त्यांच्या घराच्या जवळच धाकटी मुलगी आदिती ही पाळीव कुत्र्याला फिरवत होती. तिला पाहून धीरज हे रस्त्यातच थांबले. त्यावेळी पाठीमागून दोन इसम काळ्या रंगाच्या मोटरसायकल वरून आले. त्यांनी धीरज यांच्यासमोर मोटार सायकल थांबविली. मोटरसायकलवरून उतरून ते दोघे धीरज यांच्या जवळ आले. तेव्हा मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाच्या हातात तलवार होती. दुसऱ्याकडे काहीतरी टोकदार हत्यार असल्याचे धीरज यांना दिसले. ते दोघेही चालत धीरज यांच्या जवळ आले व शिवीगाळ करत एकाने तलवारीने वार केले. धीरज यांनी आडवा हात पुढे करून प्रतिकार केला. त्यामुळे त्यांच्या डाव्या हाताला गंभीर जखम झाली असून ते थोडक्यात बचावले.
त्यानंतर काही क्षणातच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. परिसरातील नागरिकांनी धीरज यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेने शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्यासह मोठा फौज फाटा धीरज यांच्या राहत्या घरी पोहोचला. ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. आमदार संग्राम जगताप यांनी धीरज यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी रुग्णालयावर नातेवाईकांचा मोठा जमाव जमला होता. या घटनेची दखल घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले असून स्थानिक गुन्हे शाखा शाखेचे दोन पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.
ठिकठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मोहीम सुरू
धीरज जोशी यांचे रामचंद्र खुंटावर मिठाईचे दुकान आहे तेथून ते कुठला डीएसपी चौक तारकपूर मिस्कीन मळा तोफखाना पोलीस स्टेशन कुष्ठधाम रोड मार्गे गुलमोहर रोड वर आले तिथून ते त्यांच्या राहत्या घरी किर्लोस्कर वसाहतीत जात होते या मार्गावरील सीसीटीव्ही तोफखाना पोलिसांकडून तपासण्यात येत आहेत आरोपी जोशी यांचा कुठून ते कुठपर्यंत पाठलाग करत होते याचा पोलिसांना शोध घ्यायचा आहे.
घटनास्थळी पिस्टल व धारदार शस्त्र
धीरज जोशी यांच्यावर हल्ला करून हल्लेखोर काही क्षणात घटनास्थळावरून पसार झाले पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यावेळी घटनास्थळी एक गावठी पिस्टल व धारदार काळ्या रंगाचे शस्त्र सापडले असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.