अहमदनगर जिल्हा बँकेला ३३ कोटींचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 05:22 PM2017-09-07T17:22:03+5:302017-09-07T17:24:43+5:30
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ३१ मार्च २०१७ अखेर संपलेल्या सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३३ कोटी २० लाख ३९ हजार १३७ रूपये १३ पैशांचा नफा झाला आहे. त्यातून सभासदांना ९ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी गुरूवारी बँकेच्या ६० व्या वार्षिक सभेत केली.
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ३१ मार्च २०१७ अखेर संपलेल्या सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३३ कोटी २० लाख ३९ हजार १३७ रूपये १३ पैशांचा नफा झाला आहे. त्यातून सभासदांना ९ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी गुरूवारी बँकेच्या ६० व्या वार्षिक सभेत केली.
गायकर यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या अधिमंडळाची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा सहकार सभागृहात झाली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी प्रास्ताविक केले. सन २०१५-१६ च्या तुलनेत २०१६-१७ मध्ये स्वभांडवल, ठेवी, बाहेरील कर्जे, दिलेली कर्जे, नफा व खेळते भांडवल या सर्वच आर्थिक स्थितीत वाढ झाली आहे. २०१६-१७ मध्ये बँकेचे स्वभांडवल ७३९ कोटी ८९ लाख रुपये, ठेवी ५ हजार २४८ कोटी ३९ लाख रुपये, बाहेरील कर्ज १ हजार ६४ कोटी २ लाख रूपये, गुंतवणूक २ हजार ४८३ कोटी ४९ लाख रूपये, दिलेली कर्जे ४ हजार ५० कोटी १७ लाख रुपये व खेळते भांडवल ७ हजार ३५७ कोटी १५ लाख रूपयांवर पोहोचले आहे. २०१६-१७ मध्ये ३३ कोटी २० लाख रूपयांचा नफा झाला असून भागधारकांना ९ टक्के लाभांश देण्यात येणार आहे. त्यासाठी १८ कोटी २९ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. ३१ मार्च २०१७ अखेर सर्व प्रकारच्या कर्ज वाटपापैकी ४०५०.१७ कोटी रुपयांची कर्ज येणे बाकी असल्याचे गायकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
मायक्रो एटीएम केंद्र
बँकेने २०१७-१८ मध्ये ग्राहकांना रूपे डेबिट व किसान क्रेडिट कार्ड देऊन बँकेचे स्वत:चे एटीएम कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्हाभरात २० एटीएम केंद्र सुरू करण्यात आली आहेत. बँकेच्या शाखा व सेवा संस्थांच्या कार्यालयांमध्ये मायक्रो एटीएम बसवून शेतकरी सभासदांना रूपे किसान क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करण्याची सुविधा पुरविली जाणार आहे. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, आ.शिवाजी कर्डिले, आ.वैभव पिचड, दत्तात्रय पानसरे, पांडुरंग अभंग, बाजीराव खेमनर, चंद्रशेखर घुले, जयंत ससाणे आदी संचालक हजर होते. तर आमदार अरूण जगताप, यशवंतराव गडाख,माजी आमदार राजीव राजळे, बिपीन कोल्हे, अरूण तनपुरे, राजेंद्र नागवडे हे संचालक गैरहजर होते. उपाध्यक्ष रामदास वाघ यांनी आभार मानले.