जिल्हा रुग्णालय आग प्रकरण; डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू, निलंबन कारवाई चुकीची असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 12:15 PM2021-11-10T12:15:15+5:302021-11-10T12:17:00+5:30
Ahmednagar : आग लागून जी दुर्घटना झाली त्याचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर झाला आहे. आरोग्य विभाग व विविध तांत्रिक विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. मृतांची उत्तरीय तपासणी झाली असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे.
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. काल पोलिसांनी चौघांना अटक केली. याप्रकरणी तीव्र पडसाद उमटले असून कर्मचारी संघटना पाठोपाठ डॉक्टर संघटना आक्रमक झाली आहे. आज सकाळी जिल्हा रुग्णालयाचे कामकाज बंद करून निषेध व्यक्त केला.
चौकशी पूर्ण होईपर्यंत वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांवर गुन्हा दाखल करणे, त्यांना अटक करणे ही कारवाई अत्यंत चुकीची व अन्यायकारक असून, त्यांच्यावर दाखल गुन्हा मागे घ्यावे, अन्यथा राज्यभर महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी संघटना, राज्य शासन आरोग्य कर्मचारी संघटना यांच्या मार्फत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान डाॅक्टर, कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्याने जिल्हा रूग्णालयातील तातडीची सेवा वगळता सर्व विभाग बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम झाला आहे.
आग लागून जी दुर्घटना झाली त्याचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर झाला आहे. आरोग्य विभाग व विविध तांत्रिक विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. मृतांची उत्तरीय तपासणी झाली असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. आगीच्या कारणाचा शोध सुरु आहे. सदोष साहित्य वापरल्यामुळे धूर सर्वत्र पसरला असावा व त्यामुळे रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला. अतिदक्षता विभागात पसरताच सर्व कर्मचारी तेथे मदतीसाठी धावून आले. स्वता:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना बाहेर काढले. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी रुग्णांवर तातडीने उपचार केले. आग आणखी पसरू नये म्हणून मुख्य प्राणवायू पुरवठा खंडित करावा लागला.
वेगाने पसरणारा काळा धूर या मुळे हवेतील प्राण वायूची कमतरता निर्माण होणे, या मुळे रुग्णाचा कमी कालावधीमध्ये गुदमरून मृत्यू झाला आहे. वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांनी रुग्णसेवेच्या कामामध्ये हलगर्जीपणा केलेला नाही. त्यामुळे डॉक्टर व परिचारिका यांना दोषी मानता येऊ शकत नाही. या दुर्घटनेची चौकशी पूर्ण होण्यापूर्वी तेथे तातडीने मदत कार्य व रुग्णसेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्यावर गुन्हा दाखल करणे, त्यांना अटक करणे ही कार्यवाही अत्यंत चुकीची व अन्यायकारक आहे. त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्यात यावे. अन्यथा सर्व राज्यभर या अन्यायकारक, चुकीच्या कारवाईविरोधात आंदोलन करण्यात येईल.