प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा बट्ट्याबोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:33 PM2019-06-22T12:33:12+5:302019-06-22T12:35:08+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करुन सुरु केलेल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा बट्ट्याबोळ उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे़
अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करुन सुरु केलेल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा बट्ट्याबोळ उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे़ या योजनेत १ हजार ३४९ आजारांचा समावेश करण्यात आला आहे़ मात्र, उपचारांवरुन बोंबाबोंब आहे़ जिल्ह्यातील एकाही रुग्णालयात या योजनेतून उपचार करण्यात येत नाही़ तसेच योजनेतील लाभार्थ्यांना दिले जाणारे आरोग्य कार्डचे वाटपही रखडले आहे़
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ सप्टेंबर २०१८ रोजी आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे उद्घाटन केले होते़ या योजनेतून प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात १ हजार ३४९ आजारांवर ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्याची घोषणा करण्यात आली होती़ तसे आदेशही निघाले़
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून राबविण्यात येत आहे. २०११ सालच्या जनगणनेनुसार या योजनेत लाभार्थी निवडण्यात आले़ १५ एप्रिल २०१८ ते ८ मे २०१८ या काळात ग्रामीण विभागात तसेच १८ मे २०१८ ते १४ जून २०१८ या काळात शहरी विभागातील लाभार्थ्यांची माहिती संकलीत करण्यात आली असून, त्यात मोबाईल क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक, कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची माहिती संकलीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले़
या योजनेच्या लाभासाठी आरोग्य कार्ड वाटप करण्यात येत आहे़ शहरी भागात जिल्हा रुग्णालयातून तर ग्रामीण भागातून सेतू केंद्रांमधून हे कार्ड वाटप करण्यात येत आहे़ सेतू केंद्राकडून एका कार्डसाठी ३० रुपये आकारण्यात येत आहेत़ मात्र, सध्या हे कार्ड वाटप रखडले आहे़
अवघ्या ६ टक्के कार्डचे वाटप
च्नगर जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत ३ लाख २० हजार ४६१ कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे़ जिल्हा शासकीय रुग्णालयासह इतर २४ खासगी रुग्णालयांतून या योजनेतील लाभार्थ्यांवर मोफत उपचार करण्यात येतात़ या उपचारांवरील ६० टक्के खर्च केंद्र सरकार व ४० टक्के खर्च राज्य सरकार भरणार आहे़ या योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्ड वाटप सुरु आहे़ जिल्हा रुग्णालयातून ४ हजार ५२ तर सेतू केंद्रांमधून १७ हजार ८४६ असे एकूण २१ हजार ८९६ कार्डचे वाटप करण्यात आले आहे़ मात्र, हे प्रमाण अवघे ६़८६ टक्के आहे़
अवघ्या १२ रुग्णांना लाभ
च्लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून या योजनेचे काम पूर्णपणे थांबविण्यात आले होते़ आचारसंहिता संपल्यानंतरही अद्याप या योजनेचे काम पुन्हा सुरु झालेले नाही़ कार्ड वाटप पूर्ण झाले नाही़ तसेच योजनेची माहितीही लोकांपर्यंत पोहोचलेली नाही़ त्याशिवाय जिल्हा रुग्णालय वगळता इतर २४ रुग्णालयांमध्ये या योजनेतून उपचार केले जात नाहीत़ त्यामुळे या योजनेतून केवळ १२ रुग्णांवर उपचार केल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली़