अहमदनगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९०.३० टक्के : पुणे विभागात नगर तिसरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 07:36 PM2018-06-08T19:36:51+5:302018-06-08T19:36:56+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पुणे विभागात नगर जिल्ह्याचा निकाल ९०.३० टक्के लागला.
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पुणे विभागात नगर जिल्ह्याचा निकाल ९०.३० टक्के लागला. गेल्या दोन वर्षांपासून नगरचा निकाल घसरत असून, यंदाही तिच परंपरा राहिली. नगर जिल्हा पुणे विभागात थेट तिसऱ्या स्थानी फेकला गेला. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली असून, मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८८.०२, तर मुलींची टक्केवारी ९३.३१ आहे. एकूण ९७२ पैकी १२५ शाळांचे निकाल १०० टक्के लागले. जिल्ह्यात ९३.६५ टक्क््यांसह श्रीगोंदा तालुका अव्वल ठरला आहे.
जिल्ह्यात यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी ७३ हजार २८७ विद्यार्थ्यांची नावनोंदणी झाली होती. यापैकी ७२ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामध्ये ४१ हजार ४९५ मुले व ३१ हजार ३६० मुलींचा समावेश होता. यापैकी ६५ हजार ७८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये ३६ हजार ५२५ मुले व २९ हजार २६२ मुलींचा समावेश आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८८.०२, तर मुलींची टक्केवारी ९३.३१ टक्के आहे. जिल्ह्यात सर्वांत जास्त निकाल श्रीगोंदा तालुक्याचा ९३.६५ टक्के, तर सर्वांत कमी निकाल श्रीरामपूर तालुक्याचा ८४. ४२ टक्के लागला.
१९ हजार ८७२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत
नगर जिल्ह्यातील एकूण ७२ हजार ८५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १९ हजार ८७२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. याशिवाय २५ हजार ६४३ जण प्रथम श्रेणीत, १७ हजार ६५९ द्वितीय श्रेणीत, तर २ हजार ९४७ विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण श्रेणीत समावेश आहे.
१७ रिपिटर प्रावीण्य श्रेणीत
जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेतील पुनर्परिक्षार्थींचा (रिपिटर) निकाल ३९.७७ टक्के लागला. जिल्ह्यातील २९५८ विद्यार्थ्यांनी पुनर्परिक्षार्थी म्हणून नोंदणी केली. यापैकी २९२९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यापैकी १७ विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. १३० जणांना प्रथम श्रेणी, १७८ जण द्वितीय श्रेणीत, तर ८४० जणांचा उत्तीर्ण श्रेणीत समावेश आहे.