अहमदनगर जिल्हा ०१ जून रोजी कोरोनामुक्त होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 04:31 PM2020-05-21T16:31:46+5:302020-05-21T16:33:21+5:30

अहमदनगर- जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यात आपण बर्‍यापैकी यशस्वी ठरलो आहोत. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ...

Ahmednagar district will be corona free on June 1 | अहमदनगर जिल्हा ०१ जून रोजी कोरोनामुक्त होईल

अहमदनगर जिल्हा ०१ जून रोजी कोरोनामुक्त होईल

अहमदनगर- जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यात आपण बर्‍यापैकी यशस्वी ठरलो आहोत. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करीत खबरदारी घेतली तर आपण या संकटावर निश्चितपणे मात करु. आगामी काळात कोरोना संसर्गाचे रुग्ण सापडले नाहीत, तर जिल्हा ०१ जून रोजी कोरोनामुक्त होईल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

 

          पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाटी करावयाच्या विविध उपाययोजनांचा तसेच इतर योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत मायकलवार, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदींची यावेळी उपस्थिती होती.

 

          पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सध्या आपल्याकडे कोरोना वाधित ६८ रुग्ण आहेत. त्यापैकी ४९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आगामी काळात कोरोना रुग्ण सापडले नाहीत, तर आपण ०१ जून रोजी कोरोनामुक्त होऊ. त्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आणि आरोग्य यंत्रणेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. जिल्ह्यात १२ मार्च २०२० रोजी पहिला रुग्ण सापडला होता.  मे महिन्यात बाहेरुन येणार्‍या नागरिक बाधित आढळण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी स्वताच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

          लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना परत त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगला पाठपुरावा केल्यामुळे आतापर्यंत ३० हजार नागरिकांपैकी २३ हजारांपेक्षा अधिक मजूर, कामगार, भाविक, विद्यार्थी त्यांच्या राज्यात परत पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत १० विशेष श्रमिक रेल्वेमार्फत त्यांना रवाना करण्यात आले आहे. आणखी ०६ रेल्वेद्वारे उर्वरित नागरिकांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्यात येणार आहे. याशिवाय, परजिल्ह्यातून तसेच परराज्यातून १६ हजार नागरिक आपल्या जिल्ह्यात परत आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

          जिल्ह्यातील नागरिक, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी कौतुक केले.

 

          यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या विविध सामाजिक योजनांच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीचा आढावाही घेतला. संजय गांधी निराधार अनुदान, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन अशा विशेष साहाय्य योजनेतील १ लाख ६२ हजार १४८ लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

 

          जिल्ह्यातील मोठ्या धरणांत सध्या ३६ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असून मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा२४ टक्के असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हयात सध्या २१ शासकीय आणि ६१ खाजगी टॅंकरद्वारे ७२ गावे आणि २९१ वाड्यांना पाणीपुरवठा होत असून टॅंकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकार्‍यांना दिल्याची माहितीही त्यांनी दिली. रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सध्या २०६९ कामे सुरु असून त्यावर १० हजार ३१० मजूर कामांवर असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

 

          जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच केशरी कार्डधारकांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियतनाप्रमाणे धान्य वाटप करण्यात आले आहे. मे महिन्यातील ८३ टक्के धान्याचे वाटप पूर्ण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्रतिमाह अर्धा किलो चणाडाळ आणि अर्धा किलो तूरडाळ वाटप करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. ***

ReplyForward

Web Title: Ahmednagar district will be corona free on June 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.