जलशक्ती अभियानात अहमदनगर जिल्हा अग्रेसर असेल : रिचा बागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 06:16 PM2019-07-11T18:16:25+5:302019-07-11T18:16:50+5:30
केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानातही नगर जिल्हा अग्रेसर असेल आणि नावीन्यपूर्ण उपक्रमातून इतरांसमोर आदर्श निर्माण करेल,
शिर्डी : केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानातही नगर जिल्हा अग्रेसर असेल आणि नावीन्यपूर्ण उपक्रमातून इतरांसमोर आदर्श निर्माण करेल, असा विश्वास केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाच्या सहसचिव रिचा बागला यांनी व्यक्त केला.
केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील २५४ जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येणार आहे. त्यात राज्यातील आठ जिल्हे निवडण्यात आले असून त्यात अहमदनगर जिल्ह्यातील राहाता, कोपरगाव संगमनेर, श्रीरामपूर व राहुरी या पाच तालुक्यांचा समावेश आहे.
या अभियानाच्या प्राथमिक तयारीसाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाच्या सहसचिव रिचा बागला यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी शिर्डीत आढावा बैठक घेतली. गटस्तरावरील कामांचे नोडल अधिकारी म्हणून केंद्र सरकारमधील संचालक सुप्रिया देवस्थळी, तांत्रिक बाबींचे नोडल अधिकारी म्हणून केंद्रीय जलसंशोधन केंद्र, पुणे येथील ए.के. आगरवाल यांचा या पथकात समावेश आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, सामाजिक वनीकरणच्या विभागीय अधिकारी कीर्ती जमदाडे-कोकाटे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख, पाचही तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते़ जलशक्ती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध बाबींचा जिल्हास्तरावर केलेल्या आराखड्याबाबत यावेळी चर्चा झाली. लोकसहभाग वाढावा, विविध यंत्रणांनी त्यांची कामे सुनियोजित पद्धतीने पूर्ण करावीत. निवड केलेल्या पाच तालुक्यातील भूजल पातळी वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत, त्यासाठी पाऊस पाणी संकलन मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात यावी. नगरपालिका , ग्रामपंचायतस्तरावरील सर्व शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, गृहनिर्माण संस्थांनी पाऊस पाणी संकलनासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याबाबत यावेळी बागला यांनी सूचना दिल्या़ शालेय पातळीवर यासंदर्भात निबंध, चित्रकला स्पधार्सारखे उपक्रम राबवावे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात अधिकाधिक कामे करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला़ यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी आणि उपजिल्हाधिकारी वाघ यांनी जिल्हास्तरावर राबविण्यात येणाºया या अभियानाच्या आराखडा अंमलबजावणीबाबत संबंधितांना माहिती दिली.