अहमदनगरमधील स्फोट क्रूड बॉम्बचा, विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 03:15 PM2018-03-21T15:15:43+5:302018-03-21T15:25:18+5:30
नगर शहरातील माळीवाडा येथील मारुती कुरिअर कार्यालयात झालेला स्फोट हा क्रूड बॉम्बचा (हाताने बनविलेला बॉम्ब) असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अहमदनगर : नगर शहरातील माळीवाडा येथील मारुती कुरिअर कार्यालयात झालेला स्फोट हा क्रूड बॉम्बचा (हाताने बनविलेला बॉम्ब) असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बॉम्ब असलेले पार्सल पुणे येथील सरहद्द संस्थेचे प्रमुख संजय नहार यांच्या नावाने पाठविण्यात आले होते़,अशी चर्चा आहे. मात्र चौबे यांनी ही बाब अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.
कुरिअर फर्ममध्ये मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पार्सलचा स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये संदीप बापूराव भुजबळ (वय ३८ रा़ खळेवाडी, भिंगार) व संजय मच्छिंद्र क्षीरसागर (वय २७ रा़ भिंगार) हे दोघे जखमी झाले आहेत़ आज घटनास्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, नाशिक येथील फॉरेन्सिक लॅबचे पथक, एटीएस, सायबर सेल, एलसीबी पथकाने भेट देऊन तपासणी केली.
चौबे पत्रकारांना माहिती देताना म्हणाले, हा स्फोट क्रूड बॉम्बचा आहे. हा बॉम्ब हाताने बनविलेला होता. रेडिओमध्ये एका पाइपमध्ये बसविण्यात आला होता. सदरचे कुरिअर पार्सल पुण्याला पाठविले जाणार होते. अहमदनगरमधील माळीवाडा येथील मारुती कुरिअर फर्ममध्ये मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने पार्सल आणून दिले होते. कुरिअर कार्यालयात काम करणाऱ्या तरुणीने हे पार्सल स्वीकारले होते़ कार्यालयात काम करणारे संदीप भुजबळ आणि संजय क्षीरसागर यांनी हे पार्सल पाहिले तेव्हा त्यातून आवाज आला़ त्या पार्सलवर एक चिठ्ठी होती़ ही चिठ्ठी एका मुलीने लिहिलेली होती. मी पुणे येथे कॉलेजला असताना आपण मला खूप मदत केली़ त्यामुळे आपणास भेट म्हणून मी हे पार्सल पाठवत आहे’ असे या चिठ्ठीत लिहिले होते़ ही चिठ्ठी वाचल्यानंतर संजय क्षीरसागर यांनी हे पार्सल उघडून पाहिले़ तेव्हा त्यात एक रेडिओ होता. या रेडिओचे बटन त्यांनी आॅन करताच स्फोट झाला. कुरिअर कार्यालयात पार्सल आणून देणा-याचे पोलिसांनी रेखाचित्र जारी केले आहे़ जेथून हे पार्सल पाठविण्यात आले होते, तो नगर शहरातील पत्ता बनावट असल्याचे समोर आले आहे.
पार्सलवर नगर शहरातील तारकपूर परिसरातील पत्ता होता़ ते पार्सल सरहद्द संस्थेचे संजय नहार यांच्या नावाने असल्याचे समजल्यानंतर नगर पोलिसांनी पुणे येथे एक पथक पाठविले आहे. नहार यांना हे पार्सल कुणी पाठवलं? कशासाठी पाठवलं? यामागे घातपाताची शक्यता आहे का? याबाबत पोलीस तपास करत असून, एकूण आठ पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.