युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ते भाजपचे खासदार : डॉ.सुजय विखे यांचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:32 AM2019-05-25T11:32:43+5:302019-05-25T11:43:50+5:30
ग्रामीण भागातील अडचणींच्या मुळाशी जाऊन त्यावर मात करण्याची जिद्द, ही डॉ. सुजय विखे यांच्या कामकाजाची खासियत मानावी लागेल.
अण्णा नवथर
अहमदनगर : ग्रामीण भागातील अडचणींच्या मुळाशी जाऊन त्यावर मात करण्याची जिद्द, ही डॉ. सुजय विखे यांच्या कामकाजाची खासियत मानावी लागेल. मितभाषी असलेले सुजय विखे हे कायम डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून वावरत असतात. आपल्या जीवनाच्या प्रारंभीपासूनच सुजय यांना आजोबा पद्मभूषण डॉ़ बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडून सहकाराचे बाळकडू मिळाले. शिर्डी लोकसभा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या सुजय विखे यांनी नंतर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये केलेली कामगिरी अचंबा करण्यासारखीच आहे. परफेक्ट नियोजन आणि प्रचंड आत्मविश्वास, यामुळेच डॉ. सुजय विखे यांची जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण झाली.
सन १९८२ मध्ये एका राजकीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रातील न्यूरोसर्जन ही पदवी पूर्ण केली. राजकीय वारसा असतानाही ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून वावरू लागले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात काम करताना शेती आणि शेतीशी संबंधित सर्वसामान्यांना येणा-या अडचणींचा मुळापासून अभ्यास करण्याची सवय त्यांना लागली. हीच सवय पुढे त्यांना जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावण्यास उपयोगी पडली. सुजय विखे यांच्याकडे असलेल्या कौशल्याची चुणूक वडील राधाकृष्ण विखे पाटील हे लढवित असलेल्या निवडणुकांमधून दिसली. राजकीय वारसा असलेल्या सुजय यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात काम करताना जिल्ह्यात युवा कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभारले. सुजय यांनी हळूहळू आपला प्रभाव वाढवित अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पाळेमुळे रुजविण्यास प्रारंभ केला. त्याचप्रमाणे दक्षिणेचा खासदार होण्याचे आजोबा डॉ. बाळासाहेब विखे यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. लोकसभेची ही निवडणूक लढविण्याची संकल्पनाही त्यांना आजोबांमुळेच मिळाली, असे ते जाहीरपणे सांगतात.
डॉ. सुजय विखे
अध्यक्ष- (डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखाना)
विश्वस्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, वडगाव गुप्ता, विळदघाट, अहमदनगर)
मुख्य कार्यकारी अधिकारी- (साई रुरल इन्स्टिट्यूट प्रवरानगर, राहाता)
अध्यक्ष- (दि- मुळा प्रवरा सहकारी वीज सोसायटी लि.श्रीरामपूर)
जन्म -1982
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष
शिर्डी लोकसभा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. सुजय विखे यांनी पदभार स्वीकारला. तेथून पुढे त्यांनी जिल्ह्यात सर्वच तालुक्यात युवकांचे मोठे जाळे उभे केले. त्यामुळेच अहमदनगर व शिर्डी, या दोन्ही लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाले.
2014
मुख्यकार्यकारी अधिकारी
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या मुख्यकार्यकारी अधिकारी पदी डॉ़ सुजय विखे यांची निवड झाली. फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक कार्य केले.
2016
विखे कारखान्यांचे अध्यक्ष
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना सुरू केला. कारखान्याच्या कारभाराची धुरा डॉ. सुजय यांच्यावर सोपविण्यात आली़ ती त्यांनी समर्थपणे पेलली. त्यामुळे त्यांचा सहकाराचा अनुभव आला. मुळा प्रवरा वीज
सोसायटीचे अध्यक्ष श्रीरामपूर तालुक्यासाठी संजीवनी ठरलेल्या दि- मुळा सहकारी वीज सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे यांची निवड झाली.
बंद पडलेला गणेश व डॉ. तनपुरे सहकारी कारखाने केले सुरू
सहकाराचा वारसा असलेल्या सुजय विखे यांनी सहकार चळवळ जिवंत रहावी, यासाठी बंद पडलेले गणेश व डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाने चालविण्यास घेतले. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
२०८ कुटुंब घेतले दत्तक
शेतीत आलेल्या सततच्या अपयशामुळे जिल्ह्यात २०८ शेतक-यांनी आत्महत्या केल्या़ आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबांना धीर देता यावा, यासाठी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आत्महत्याग्रस्त शेतकरी सहाय्य योजना सुरू केली. ही सर्व कुटुंब विखे पाटील परिवाराने दत्तक घेतली. या परिवारातील विद्यार्थ्यांना शिक्षण, आरोग्य आणि विवाहासाठी आर्थिक मदत करण्यात येते़.
५० हजार रुग्णांची आरोग्य तपासणी
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात २१ आरोग्य शिबिरांचे आयोजन केले़ आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या मतदारसंघातील ५० हजार रुग्णांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले.
१०२ कुटुंबीयांना २ कोटींचा विमा
मोफत अपघात विमा योजनेचा उपक्रम राबविला़ आत्तापर्यंत १ लाख ५० हजार नागरिकांचा विमा उतरविण्यात आला असून, या विम्याची रक्कम जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून भरण्यात येत आहे़ आत्तापर्यंत १०२ कुटुंबीयांना २ कोटी रुपयांच्या विम्याचा लाभ देण्यात आला.