‘अहिल्यानगर’साठी विखेंना पुन्हा दिल्लीला पाठवा; प्रचारात आला नामकरणाचा मुद्दा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 08:51 AM2024-04-23T08:51:23+5:302024-04-23T08:52:13+5:30
गेल्या ५० वर्षांत राहुल गांधी यांचे लाँचिंग होऊ शकले नाही. ते काय देश पुढे नेणार? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
अहमदनगर : सुजय विखे यांची गाडी पुन्हा दिल्लीला जाऊन मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अहमदनगरचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ होईल. मुख्यमंत्र्यांनी नामकरणास मंजुरी दिली आहे; पण दिल्लीची मंजुरी बाकी आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरच्या नामकरणाचा मुद्दा प्रचारात छेडला.
भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी शहरात चौपाटी कारंजा येथे प्रचारफेरीच्या सांगता सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी विरोधी उमेदवार नीलेश लंके यांचा उल्लेख लंका असा केला. ते म्हणाले, सुजय विखे पराभूत होणे अशक्य आहे. त्यांचे मताधिक्य वाढवून त्यांना संसदेत पाठवायचे असून, विरोधकांच्या लंकेचे दहन करायचे आहे. गेल्या ५० वर्षांत राहुल गांधी यांचे लाँचिंग होऊ शकले नाही. ते काय देश पुढे नेणार? कुणी स्वप्नात जरी विचार केला तरी राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होऊ शकणार नाहीत.’
लोखंडेंची जबाबदारी विखेंवर : शिंदे
शिर्डी मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनीही सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस यांच्या उपस्थितीत राहाता येथे झालेल्या सभेत शिंदे म्हणाले, मी विखेंना जेव्हा लोखंडे यांच्या उमेदवारीबद्दल बोललो तेव्हा विखे पाटील म्हणाले की, थोडी मेहनत घ्यावी लागेल. मात्र, लोखंडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही तुमची आहे, असे आपण त्यांना सांगितले आहे.