अहमदनगर महापालिका आयुक्तांनी सोडला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 09:16 PM2018-05-09T21:16:48+5:302018-05-09T21:18:12+5:30
महानंदाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली होवूनही रुजू न झाल्याने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आयुक्त घनश्याम मंगळे यांना रुजू न झाल्यास कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे मंगळे यांनी तातडीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आयुक्तपदाचा कार्यभार सोपवून बुधवारी ते रवाना झाले.
अहमदनगर : महानंदाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली होवूनही रुजू न झाल्याने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आयुक्त घनश्याम मंगळे यांना रुजू न झाल्यास कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे मंगळे यांनी तातडीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आयुक्तपदाचा कार्यभार सोपवून बुधवारी ते रवाना झाले.
महापालिकेच्या आयुक्तपदी मंगळे हे आॅगस्ट २०१७ मध्ये रुजू झाले होते. वर्ष होण्याच्या आतच त्यांची बदली झाली. मंगळे यांची महानंदाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी १३ एप्रिल रोजी बदली झाली. मात्र त्याचवेळी द्विवेदी हे नव्यानेच जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यामुळे मंगळे यांचा कार्यभार घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला होता. २७ एप्रिल रोजी आयुक्तांनी त्यांचा पदभार जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवावा, असे शासनाने आदेश दिला होता. मात्र जिल्हाधिकारी व्यस्त असल्याने मंगळे यांना पदभार सोपविण्यास अडचणी आल्या. मंगळवारी (दि. ८) सायंकाळी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे पत्र आयुक्तांना मिळाले. ९ मे रोजी महानंदाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार न घेतल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराच पत्रात दिला होता. पत्र मिळताच आयुक्तांनी सायंकाळीच जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मात्र तेथे तहसीलदारांची बैठक सुरू असल्याने आयुक्तांना रात्री आठपर्यंत ताटकळत राहावे लागले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी प्रक्रिया पूर्ण करून आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. बुधवारी मध्यान्हपूर्व काळात मंगळे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार सोडला आणि ते लगेच मुंबईला रवाना झाले.
आर्दड ‘स्वीच आॅफ’
औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ आर्दड यांची महापालिका आयुक्त म्हणून नगरला बदली झाली होती. मात्र त्यांनी पहिल्यापासूनच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्यास नकार दिला. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा मोबाईल स्वीच आॅफ आहे. त्यामुळे आर्दड हे नगरला येण्याची शक्यता कमीच आहे. अशा स्थितीत जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडेच किमान महिनाभर तरी पदभार राहण्याची शक्यता महापालिका वतुर्ळात व्यक्त झाली आहे.