Ahmednagar Election: भाजपाला 'जोर का झटका', खासदाराच्या मुलगा-सुनेसह चार जणांचे अर्ज बाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 08:49 AM2018-11-23T08:49:58+5:302018-11-23T12:12:08+5:30
अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी केडगावचे काँग्रेसचे पाच उमेदवार ऐनवेळी पक्षात घेऊन आघाडीवर असलेल्या भाजपाला निवडणुकीआधीच मोठा झटका बसला आहे.
अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी केडगावचे काँग्रेसचे पाच उमेदवार ऐनवेळी पक्षात घेऊन आघाडीवर असलेल्या भाजपाला निवडणुकीआधीच मोठा झटका बसला आहे. तब्बल चार उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून त्यात खुद्द भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी याचे पुत्र सुवेद्र गांधी व त्यांच्या स्नुषा दीप्ती सुवेद्र गांधी यांचा समावेश आहे. शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांचा अर्जही बाद झाल्याने तब्बल सहा वेळा नगरसेवक झालेल्या बोराटे यांना मोठा झटका बसला आहे.
त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार योगेश चिपाडे यांचाही अर्ज बाद ठरला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी शाहुराज मोरे यांनी शुक्रवारी पहाटे 2.30 वाजता हा निकाल दिला. एवढ्या रात्री निकाल देण्याची घटना महापालिका निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच घडली आहे. सुवेद्र गाधी यांनी प्रभाग क्रमांक 11मधून अर्ज दाखल केला होता, तर त्यांच्या पत्नी दीप्ती गांधी यांनी प्रभाग 12मधून अर्ज दाखल केला होता. दोघांच्या अर्जावर अनुक्रमे गिरिश जाधव व संभाजी कदम यांनी आक्षेप घेतला होता. दुपारी सुनावणी झाल्यानंतर या अर्जावरील निकाल राखीव ठेवण्यात आला होता. आज पहाटे 2.30 वाजता दोघांचे अर्ज बाद ठरवण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.
भाजपा खासदार दीलिप गांधी
प्रभाग क्रमांक 12 मधील भाजप उमेदवार सुरेश खरपुडे यांच्याकडे मालमत्ता कराची थकबाकी व मंगल कार्यालयाचे अनाधिकृत बांधकाम केल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. प्रदीप परदेशी यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरूद्ध कैलास शिंदे यांनी अनाधिकृत बांधकामाची तक्रार दाखल केली होती. विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी प्रभाग 12 मधून अर्ज दाखल केला होता. संजय घुले यांनी त्यांच्या विरूद्ध आक्षेप अर्ज दाखल केला होता. त्यांचा मालमत्ता कराची थकबाकी व मोबाईल टावरच्या कराची थकबाकी असा त्यांच्या अर्जावर आक्षेप होता.
सुवेंद्र गांधी
प्रभाग क्रमांक 8मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार योगेश चिपाडे यांच्याकडे मालमत्ता कराची थकबाकी होती. प्रभाग क्रमांक 10 मधील अपक्ष उमेदवार व माजी नगरसेवक सय्यद सादिक यांच्याकडे 87 हजार रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी होती.
या उमेदवारांचे अर्ज बाद
विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे (शिवसेना)
योगेश चिपाडे (राष्ट्रवादी)
खासदार पुत्र सुवेंद्र गांधी (भाजपा)
खाससदारांच्या सून दीप्ती गांधी (भाजप)
सुरेश खरपुडे (भाजपा)
प्रदिप परदेशी (भाजपा)
बेरीज-वजाबाकी सेम
भाजपाने केडगावमधील काँग्रेसचे पाच उमेदवार भाजमध्ये आणल्यामुळे भाजपाला 68 जागांवर उमेदवार देता आले, मात्र छाननीत भाजपाचे चार उमेदवार उडाल्याने भाजपाची बेरीज-वजाबाकी सारखी झाली. आता भाजपाचे 64 जागांवर उमेदवार राहिले असून या प्रभागात भाजप अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करण्याची शक्यता आहे.