अहमदनगर महापालिका महापौर निवडणूक : शिवसेना-राष्ट्रवादीचे नगरसेवक सहलीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 11:32 AM2018-12-23T11:32:14+5:302018-12-23T11:32:31+5:30
भाजपने कोणालाही उमेदवारी जाहीर केली नसली तरी महापौरपदासाठी नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांनी स्वत:हुन मोर्चेबांधणी केली आहे.
अहमदनगर : भाजपने कोणालाही उमेदवारी जाहीर केली नसली तरी महापौरपदासाठी नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांनी स्वत:हुन मोर्चेबांधणी केली आहे. खबरदारी म्हणून भाजपापाठोपाठ आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकही सहलीवर रवाना झाले आहेत. काँग्रेसच्या पाच जणांचा रविवारी निर्णय होणार आहे.
महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवडणूक २८ डिसेंबरला होत आहे. ६८ पैकी शिवसेनेच्या सर्वाधिक २४ जागा निवडून आल्या असल्या तरी महापौरपदाच्या मोर्चेबांधणीत भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी विद्यमान स्थायी समितीचे सभापती तथा नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांनी महापौरपदासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. वाकळे वगळता भाजपचे सर्वच्या सर्व १३ नगरसेवक सहलीवर आहेत. त्यापाठोपाठ शिवसेनेचे २४ नगरसेवक आणि एका अपक्षासह राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ नगरसेवक शुक्रवारीच सहलीवर रवाना झाले.
महापौर निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस बुधवारी (दि.२६) अधिकृतपणे जाहीर करणार आहे, तर काँग्रेसचा निर्णय रविवारी (दि.२३) होणार आहे. शिवसेनेने सर्वात आधी महापौरपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. त्यानुसार विद्यमान
विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी जुळवाजुळव सुरू केली
आहे.
भाजप तिसऱ्या स्थानी असला तरी भाजपाशिवाय कोणालाही सत्ता स्थापन करणे शक्य नाही. त्यामुळे भाजपानेच महापौरपदासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचे पाच नगरसेवक आहेत. महापौर निवडणुकीत नेमके कोणासोबत जायचे, याचा निर्णय रविवारी डॉ. सुजय विखे हे घेणार असल्याची माहिती आहे.
काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये फूट पडली, काँग्रेसचे दोन नगरसेवक सेनेसोबत, तर दोन भाजपसोबत जाणार असल्याच्या केवळ अफवा आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. काँग्रेसच्या पाचही नगरसेविका एकत्र आहेत. महापौर निवडणुकीत नेमकी भूमिका काय घ्यायची, याबाबत रविवारी (दि.२३) होणा-या बैठकीत निर्णय होईल. डॉ. सुजय विखे यांनी दिलेला निर्णय सर्वांना मान्य असेल.
- सुप्रिया जाधव, गटनेत्या, काँग्रेस