अहमदनगर महापालिका स्थायी समिती इतिवृत्ताच्या मंजुरीत कोट्यवधींचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 07:03 PM2018-04-26T19:03:59+5:302018-04-26T19:06:11+5:30
महापालिकेच्या स्थायी समितीच्या मागील आठ सभांचे इतिवृत्त कोणतीही चर्चा न करता मंजूर केले आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा दडलेला आहे. सभेतील कार्यक्रम पत्रिकेवर (अजेंडा) विषय न घेता अनेक विषय इतिवृत्तात बेकायदेशीरपणे घुसडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या मागील आठ सभांचे इतिवृत्त कोणतीही चर्चा न करता मंजूर केले आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा दडलेला आहे. सभेतील कार्यक्रम पत्रिकेवर (अजेंडा) विषय न घेता अनेक विषय इतिवृत्तात बेकायदेशीरपणे घुसडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये गतवर्षात झालेल्या स्थायी समितीच्या आठ सभांचे इतिवृत्त (सभेतील मंजूर विषयाचा सविस्तर अहवाल, चर्चा व घेतलेला निर्णय) कायम करण्यासाठी सभेसमोर होते. यामध्ये २०१६ या वर्षातील १७ डिसेंबर, २०१७ या वर्षातील १६ फेब्रुवारी, १४ मार्च, १० एप्रिल, ३ जून, ३ जुलै, २८ आॅगस्ट, २९ सप्टेंबर अशा एकूण आठ सभांच्या इतिवृत्ताचा समावेश होता. या सभेबाबत बोराटे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सदरचे इतिवृत्त सविस्तरपणे वाचावे. त्यावर चर्चा होवून ते मंजूर करावे, अशी मागणी सभापतींकडे केली होती. मात्र त्यात काही गडबड असल्यानेच त्यावर सभापतींनी चर्चा होवू दिली नाही. प्रत्यक्ष सभेच्या कार्यक्रमपत्रिकेवर न घेतलेले विषय इतिवृत्तात समावेश करून त्यावर चर्चा झाल्याचे भासविण्यात आले आहे. यामध्ये मोठा घोटाळा झाला, तर त्याला सर्वस्वी अधिकारीच जबाबदार राहतील. केवळ तीन दिवसांच्या सभेचा अजेंडा काढल्याने इतिवृत्तावर अभ्यास करण्यास सदस्यांना वेळ मिळाला नाही.
तारकपूर येथे एका खासगी रुग्णालयासाठी एका डॉक्टरांच्या समुहाला कोट्यवधी रुपयांची जागा भाडेपट्ट्याने दिली आहे. तो विषय सभेत अनाधिकृतपणे घुसडण्यात आला आहे. नेहरु मार्केट आणि प्रोफेसर कॉलनी व्यापारी संकुलाच्या निविदा प्रस्तावाला शासनाने स्थगिती दिली आहे. असे असताना सदरचे विषय मंजूर केल्याचे इतिवृत्तात नमूद केले आहे, असा आरोप करीत सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचे बोराटे म्हणाले. जबाबदार अधिकारी नसतील तर सभा घेवू नका, असे आमचे म्हणणे होते. मात्र आमची मागणी सभापतींनी फेटाळली. नगरसेविका कलावती शेळके, मुदस्सर शेख, संजय लोंढे यांनीही इतिवृत्त मंजुरीस विरोध केला.
त्याचा माझ्याशी संबंध नाही.
ज्या मागील सभांचे इतिवृत्त मंजूर केले, त्यातील बहुतांश विषयांमध्ये सूचक व अनुमोदक म्हणून बाळासाहेब बोराटे हेच आहेत. सर्व विषय पूर्वीच्या सभापतींच्या काळात मंजूर झाले होते. मी आठ महिन्यांपासून सभापती आहे. इतिवृत्तात मोठा घोटाळा झाला असेल तर तो माजी सभापतींच्या काळातील आहे. त्याचा माझ्याशी संबंध नाही.
-सुवर्णा जाधव, सभापती