'पावसाळ्यात झाड लावा, हिवाळ्यात क्वार्टर फ्री मिळवा'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 02:46 PM2019-07-11T14:46:21+5:302019-07-11T15:12:17+5:30
अहमदनगर महापालिकेच्या अधिकाऱ्याला नोटीस
अहमदनगर : वृक्ष लागवड अभियानाची एक चळवळ व्हावी म्हणून शासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहे. अधिकारीही वेगवेगळ्या गटांना, संघटनांना झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. अशीच एक योजना अहमदनगर महापालिकेच्या स्वच्छता विभागातील एका अधिकाऱ्याने आणली आहे. पावसाळ्यात एक झाड लावा, वाढवा आणि हिवाळ्यात एक क्वार्टर मोफत मिळवा, अशी ही योजना आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या व्हॉटस् अॅप ग्रुपवर स्वच्छता निरीक्षक कुमार देशमुख या अधिकाऱ्याने ‘झाड लावा, क्वार्टर मिळवा’ या योजनेची घोषणा केली. पावसाळ्यात लावलेले झाड वाढवा आणि हिवाळ्यात एक क्वार्टर मोफत मिळवा, या सुवर्णसंधीचा लाभ घ्या, असे या अधिकाऱ्याने आपल्या व्हॉटस् अॅपवरील मॅसेजमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे ही योजना फक्त मुकादमांसाठी असल्याचेही म्हटले आहे. हा मेसेज ग्रुपवर आल्यानंतर काही क्षणातच सर्वत्र या ग्रुपचे स्क्रीन शॉट व्हायरल झाले. ही अनोखी घोषणा ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. महापालिका कर्मचारी युनियनने थेट आयुक्तांकडेच तक्रार केली. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला नोटीस बजावल्याचे महापालिकेतून सांगण्यात आले.