अहमदनगर महापालिकेसमोर महिलांनी फोडले माठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 07:49 PM2017-12-26T19:49:59+5:302017-12-26T19:54:06+5:30
भिस्तबाग महाल,तपोवन रोड परिसरातील वसाहतीमध्ये अवेळी पाणी पुरवठा होतो, तसेच पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी दुपारी महापालिकेसमोर माठ फोडले.
अहमदनगर : भिस्तबाग महाल,तपोवन रोड परिसरातील वसाहतीमध्ये अवेळी पाणी पुरवठा होतो, तसेच पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी दुपारी महापालिकेसमोर माठ फोडले. या आंदोलनात आमदार संग्राम जगताप हेही सहभागी झाले. अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांनी आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर दोन तास चाललेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक संपत बारस्कर, कुमारसिंह वाकळे यांच्या नेतृत्त्वाखाली महिलांनी महापालिकेवर मोर्चा आणला. या मोर्चात आ. संग्राम जगताप हेही सहभागी झाले आणि त्यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका केली. आंदोलनातील महिलांनी महापालिकेच्या प्रांगणात दहा ते बारा माठ फोडून महापालिकेचा निषेध केला. त्यानंतर तब्बल दोन ते अडीच तास आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या दिला.
भिस्तबाग महाल रोड आणि तपोवन रोड परिसरातील नंदनवन नगर, पवन नगर, गोकुळ नगर, साईराम नगर, तुळजा नगर, जय भवानी नगर, दत्त नगर, तपोवन रोड परिसर, भिस्तबाग महाल रोड परिसरात असलेल्या वसाहतीमध्ये रात्री वेळी-अवेळी पाणी पुरवठा होतो. तो कमी दाबाने असल्याने परिसरात पाणी टंचाई झाली आहे. संपूर्ण भागाला सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा व्हावा, यासाठी भिस्तबाग चौकातील मुख्य जलवाहिनीवरून सध्या अस्तित्त्वात असलेली जलवाहिनी जोडण्यात यावी. त्यामुळे संपूर्ण भागाला वेळेवर आणि समान पाणी पुरवठा करता येणार आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही न झाल्याने ठिय्या देण्याचा निर्णय प्रभागातील नागरिकांनी घेतल्याचे संपत बारस्कर यांनी सांगितले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा. माणिक विधाते, कुमारसिंह वाकळे, अजिंक्य बोरकर, प्रकाश भागानगरे, अमित खामकर, गुड्डू खताळ, सचिन लोटके, साधना बोरुडे, आदी सहभागी झाले होते.
अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता महादेव काकडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. आठ दिवसांमध्ये २४ इंची मुख्य जलवाहिनीवरून अस्तित्त्वात असलेल्या जलवाहिनीला कनेक्शन जोडून देण्यात येईल. तसेच कॉटेज कॉर्नर, डॉन बॉस्को, सुमन कॉलनी, सागर विहार या भागाचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल. तसेच या भागासाठी स्वतंत्र व्हॉल्व्हमन देण्यात येईल, असे आश्वासन वालगुडे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.