अहमदनगर मनपा पथदिवे घोटाळा; अधिका-यांना वाटले १० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 09:04 PM2018-03-05T21:04:50+5:302018-03-05T21:05:30+5:30

अहमदनगर महानगरपालिकेतील पथदिवे घोटाळ्यात रोज नवनवीन खुलासे होत असून आता या घोटाळ्यातील आरोपी ठेकेदार सचिन लोटके याने कामे मिळवण्यासाठी मनपातील अधिका-यांना चक्क १० लाख रूपये रोख वाटल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे.

Ahmednagar Municipal Pathadi scam; Officials thought 10 lakhs | अहमदनगर मनपा पथदिवे घोटाळा; अधिका-यांना वाटले १० लाख

अहमदनगर मनपा पथदिवे घोटाळा; अधिका-यांना वाटले १० लाख

अहमदनगर : महानगरपालिकेतील पथदिवे घोटाळ्यात रोज नवनवीन खुलासे होत असून आता या घोटाळ्यातील आरोपी ठेकेदार सचिन लोटके याने कामे मिळवण्यासाठी मनपातील अधिका-यांना चक्क १० लाख रूपये रोख वाटल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. याबाबतची माहिती सोमवारी तपासी अधिका-यांनी न्यायालयात दिली. अधिक तपासासाठी ठेकेदार लोटके याच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली.
मनपाच्या पथदिवे कामात ३४ लाख ६५ हजार रुपयांचा घोटाळा झाला असून, याप्रकरणी महानगरपालिकेतील विद्युत विभागाचा प्रमुख रोहिदास सातपुते विद्युत विभागाचा पर्यवेक्षक बाळासाहेब सावळे, ठेकेदार सचिन लोटके व लिपिक भरत काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी यातील काळे व लोटकेला अटक केली आहे. तर सातपुते व सावळे फरार आहेत.
सचिन लोटके याची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्याला सोमवारी मुख्य न्यायंदडाधिकारी आर. एम. कुलकर्णी यांच्यासमोर हजर करण्यात आले. महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना ठेकेदार लोटके याने कसे पैसे वाटले, याबाबत तपासी अधिकारी सुरेश सपकाळे यांनी न्यायालयाला माहिती दिली. या घोटाळ्यातील आरोपी महानगरपालिकेतील विद्युत विभागाचा निलंबित प्रमुख रोहिदास सातपुते याला ५ लाख रुपये, विद्युत विभागाचा पर्यवेक्षक बाळासाहेब सावळेला ५० हजार, निलंबित उपायुक्त विक्रम दराडे यांना २ लाख रुपये, कॅफो दिलीप झिरपे यांना १ लाख रुपये, महापौर कार्यालयातील कर्मचारी शशिकांत देवकर याला १ लाख ५० हजार रुपये अशी रक्कम ठेकेदार लोटकेने वाटली असून, याबाबत चौकशी करायची असल्याची माहिती तपासी अधिकाºयाने न्यायालयात दिली आहे. ही सर्व रक्कम ठेकेदार लोटके याने रोख स्वरूपात वाटली आहे, असा जबाब त्याने तपासात दिला आहे, असेही सपकाळे म्हणाले.
दरम्यान, या घोटाळ्यात आता ठेकेदार लोटके, सातपुते, सावळे व लिपिक भरत काळेंपाठोपाठ उपायुक्त दराडे, कॅफोझिरपे व कर्मचारी देवकर अशी तीन नावे समोर आली आहेत.

Web Title: Ahmednagar Municipal Pathadi scam; Officials thought 10 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.