अहमदनगर मनपा : सभापती निवडी लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 02:37 PM2019-01-23T14:37:46+5:302019-01-23T14:38:37+5:30
महापालिकेतील राजकीय पक्षांच्या गटनोंदणीचा घोळ महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पथ्यावर पडला आहे.
अहमदनगर : महापालिकेतील राजकीय पक्षांच्या गटनोंदणीचा घोळ महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पथ्यावर पडला आहे. पैसे खर्च करून सभापतीपदे मिळविली तर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये कोणतीही विकास कामे करता येणार नाहीत. याच धास्तीने सध्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी आतूर झालेले इच्छुक थंडावले आहेत. सभापतीपदाच्या निवडीची काही घाई नाही, असेच महापालिकेतील सत्ताधारी भाजपने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर निवड झाली. त्यानंतर एक महिन्याच्या आत स्वीकृत सदस्य नियुक्त होणे आवश्यक असते. मात्र बहुजन समाज पक्षाने दुसऱ्यांदा गटनोंदणीचा प्रस्ताव दाखल केला. त्यावर विभागीय आयुक्तांनी अद्याप निर्णय दिला नाही. मात्र या घोळामुळे स्वीकृत, स्थायी समिती आणि महिला बालकल्याण समिती सदस्यांच्या नियुक्तीसाठी महापालिकेची विशेष सभा लांबणीवर पडली आहे. आधी स्थायी समितीचे सदस्य नियुक्त होणे आवश्यक आहे. सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो. मात्र सदस्यांच्या नियुक्त्याच झाल्या नसल्याने सभापती निवडही सध्या तरी होणे शक्य नाही. दरम्यान सदस्य नियुक्तीसाठी नगरसचिव कार्यालयाने प्रस्ताव तयार केला आहे. मात्र त्याला अद्याप महापौरांनी हिरवा कंदिल दाखविला नाही. नियमानुसार गटनोंदणी एकदाच होते. त्यामुळे सध्याच्या संख्याबळानुसार सदस्य नियुक्ती होऊ शकतो. मात्र बसपाने नव्याने दाखल केलेला प्रस्ताव भाजपच्या पथ्यावर पडला आहे. विशेष सभा बोलविण्याची घाई नाही, असे भाजपने स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे. शक्य झाले तर फेब्रुवारीतच स्थायी समिती सदस्य नियुक्ती होऊ शकते. सभापती निवड झाल्यानंतर आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे सभापती पद घेऊन काय करणार? अशा चर्चा महापालिका वर्तुळात आहेत. आचारसंहितेच्या धास्तीनेच इच्छुकांनीही सध्या तलवार म्यान केली आहे.