कोणाचा होणार महापौर ? महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीची सोबत एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 11:15 AM2018-12-28T11:15:04+5:302018-12-28T11:34:11+5:30
महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा व राष्ट्रवादीच्या नगरसेवक एकत्र....
अहमदनगर : महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपा व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिका सभागृहात सोबत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी निवडणुकीतून माघार घेऊन भाजपाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांना पाठिंबा देणार असण्याची शक्यता आहे. महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे भाजपाला मिळण्याची चिन्हे आहेत. मंत्री गिरीश महाजन या निवडणुकीसाठी सकाळीच नगरमध्ये दाखल झाले आहेत. भाजपाचे उमेदवार वाकळे व राष्ट्रवादीचे उमेदवार संपत बारस्कर यांचे हातात हात घालूनच महापालिकेत आगमन झाले. सभेला सुरुवात झाली आहे.
अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवड काही क्षणात होणार आहे. महापौरपदासाठी भाजपाकडून बाबासाहेब वाकळे, शिवसेनेकडून बाळासाहेब बोराटे तर राष्ट्रवादीकडून संपत बारस्कर रिंगणात आहेत. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने सभागृहात चमत्कार होणार आहे. भाजपाकडून बाबासाहेब वाकळे यांना उमेदवारी दिली आहे. तर उपमहापौरपदासाठी भाजपाकडून मालनताई ढोणे अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडून संपत बारस्कर यांनी अर्ज दाखल केला आहे. उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या रुपाली वारे अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेकडून बाळासाहेब बोराटे महापौर पदासाठी रिंगणात आहेत.
महापालिकेत शिवसेना(२४), भाजप (१४), राष्ट्रवादी(१८), काँग्रेस(५), बसपा(४), सपा(१), अपक्ष(२) असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे सभागृहात काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.