जिल्ह्यात पाऊस लांबला, २० दिवसांत टँकरची संख्या १६ वरून ४५ वर

By चंद्रकांत शेळके | Published: July 5, 2023 04:08 PM2023-07-05T16:08:57+5:302023-07-05T16:09:43+5:30

एप्रिलपर्यंत एकही टँकर जिल्ह्यात सुरू नव्हता

Ahmednagar News Number of tankers increased from 16 to 45 in 20 days as No Rains in district | जिल्ह्यात पाऊस लांबला, २० दिवसांत टँकरची संख्या १६ वरून ४५ वर

जिल्ह्यात पाऊस लांबला, २० दिवसांत टँकरची संख्या १६ वरून ४५ वर

चंद्रकांत शेळके, अहमदनगर: पाऊस लांबल्याने जिल्ह्यात दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील ४९ गावे व २६२ वाडी-वस्तीवरील ८७ हजार ४६ लोकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाऊस वेळेत न पडल्यास या महिन्यात टँकरच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते. दरम्यान, गेल्या २० दिवसांत टँकरची संख्या १६ वरून ४५ झाली आहे.

मागील वर्षी चांगला पाऊस पडल्याने यंदा उन्हाळ्यात टंचाईजन्य स्थिती जाणवली नाही. परिणामी पाण्याच्या टँकरची संख्याही मर्यादित राहिली. जूनमध्ये पाऊस पडल्यास पाण्याची कमतरता भासत नाही. परंतु, यंदा पूर्ण जून महिना संपला तरी अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ८७ हजार लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिलपर्यंत एकही टँकर जिल्ह्यात सुरू नव्हता. थेट १८ एप्रिलला संगमनेर व अकोले तालुक्यात प्रत्येकी एक टँकर सुरू झाला. त्यानंतर मे व आता जूनमध्ये टँकरची संख्या वाढली. १२ जूनपर्यंत टँकरची संख्या १६ होती. ती आता ४५ झाली आहे.

सर्वाधिक टँकर पारनेर तालुक्यात, जिल्ह्यात सुरू असलेल्या ४५ पैकी सर्वात जास्त १४ टँकर पारनेर तालुक्यात सुरू आहेत. त्यानंतर १० टँकर संगमनेर तालुक्यात, १० टँकर पाथर्डी तालुक्यात, ९ टँकर नगर तालुक्यात, तर २ टँकर अकोले तालुक्यात सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या ४९ गावे व २६२ वाडीवस्त्यांवरील ८७ हजार ४६ ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्याने भागत आहे.

३४ खासगी टँकर

एकूण ४५ पैकी ११ ठिकाणी शासकीय टँकरने, तर ३४ ठिकाणी खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात अद्यापपर्यंत जिल्ह्यातील ५ तालुक्यांतच टँकर सुरू आहेत.

Web Title: Ahmednagar News Number of tankers increased from 16 to 45 in 20 days as No Rains in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.