अहमदनगर पथदिवे घोटाळा: माझ्या जीवाला काही झाल्यास आयुक्तच जबाबदार - काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 02:55 PM2018-02-13T14:55:21+5:302018-02-13T14:55:48+5:30
पतीचा पगार बँकेत आहे. पगाराव्यतिरिक्त बँकेत पैसे नाही. तरीही बँक खाते सील केलेय. आता भीक मागून जगायची वेळ आलीय. घर हप्त्याने घेतले असून गाडी, मोबाईलही कर्ज काढू घेतलाय. त्यामुळे देणेकरी दारात आहेत. माझ्या जीवाला काही झाले तर आयुक्तच जबाबदार असतील
अहमदनगर : पतीचा पगार बँकेत आहे. पगाराव्यतिरिक्त बँकेत पैसे नाही. तरीही बँक खाते सील केलेय. आता भीक मागून जगायची वेळ आलीय. घर हप्त्याने घेतले असून गाडी, मोबाईलही कर्ज काढू घेतलाय. त्यामुळे देणेकरी दारात आहेत. माझ्या जीवाला काही झाले तर आयुक्तच जबाबदार असतील, असे महापालिकेतील विद्युत विभागातील कर्मचारी भरत काळे यांच्या पत्नीने सांगितले.
महापालिकेत पथदिवे घोटाळा उघडकीस आल्यानंतर यातील आरोपी असलेले भरत काळे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मंगळवारी दुपारी भरत काळे यांची पत्नी प्रतिभा यांनी टिळक रोडवरील कामगार युनियनच्या कार्यालयात पत्रकारांसमोर आपली कैफियत मांडली.
प्रतिभा काळे म्हणाल्या, महापालिकेचा विद्युत विभाग ठेकेदारामार्फत चालविला जात असल्याची पत्रे भरत काळे यांनी आयुक्तांना दिली होती. वरिष्ठांकडून त्रास होत असल्यांने विद्युत विभागातून अन्यत्र बदली करावी, अशी मागणीही काळे यांनी आयुक्तांकडे केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने विनाकारण पतीला त्रास झाला. रोहिदास सातपुते अनेकवेळा भरत काळेला धमकी द्यायचे. भरत काळे यांनी पत्रांद्वारे आयुक्तांकडे घोटाळ्याची कल्पना दिली होती. दबाव आणून काम करवून घेतले जात असल्याचे या पत्रात भरत काळे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र, त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे भरत काळे हे या प्रकरणात अडकले आहेत, असे प्रतिभा काळे यांनी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान भरत काळे यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रांच्या काही कॉपी प्रतिभा काळे यांना सापडल्या असून, या पत्रांच्या कॉपी त्यांनी कामगार युनियनकडे सुपूर्द केल्या आहेत.