अहमदनगरमध्ये कत्तलखान्यावर छापा, ५३ गायींची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 08:54 PM2018-03-29T20:54:26+5:302018-03-29T20:55:23+5:30
स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील झेंडीगेट येथे कत्तलखान्यावर छापा टाकून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. यात कत्तलीसाठी आणलेल्या ५३ जनावरांची सुटका करून पोलिसांनी ७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अहमदनगर : स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील झेंडीगेट येथे कत्तलखान्यावर छापा टाकून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. यात कत्तलीसाठी आणलेल्या ५३ जनावरांची सुटका करून पोलिसांनी ७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शहरातील झेंडीगेट परिसरात मोठ्या प्रमाणात गोमांस विक्री होत असून येथे कत्तलीसाठी जनावरे आणली जाणार असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानुसार झेंडीगेट परिसरातील एवन टी स्टॉलशेजारी असलेल्या कत्तलखान्यात गुरूवारी सकाळी पोलिसांनी छापा टाकला. यात कत्तलीसाठी आणलेली ५३ लहान मोठी जनावरे, १३२० किलो गोमांस असा एकूण ७ लाख २ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोहत्येला बंद असतानाही अवैधरित्या गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर सहाजण पळून गेले. या सर्वांविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या सूचनेनुसार झालेल्या या कारवाईत श्रीधर गुठ्ठे, सुधीर पाटील, मन्सूर सय्यद, दत्ता हिंगडे, नानेकर, गाजरे, रवींद्र कर्डिले, दत्ता गव्हाणे, मनोहर गोसावी, सचिन अडबल, संदीप घोडके, भागीनाथ पंचमुख, विशाल दळवी, रावसाहेब हुसळे, विजय ठोंबरे, पशुवैद्यकीय अधिकारी अनिल बोठे आदींनी सहभाग घेतला.
या आरोपींवर गुन्हा
या कारवाईत सलीम बुढण कुरेशी (वय ५०, भिंगार), इजाज अहमद कुरेशी (४५, हातमपुरा), आरिफ शब्बीर कुरेशी (वय ४०, नालबंदखुंट), शकील बाबासाहेब कुरेशी (३२, झेंडीगेट), जाकीर खलील कुरेशी (३५, झेंडीगेट), अकील जलील कुरेशी (वय ३०, झेंडीगेट.) या सहाजणांना पोलिसांनी अटक केली. तर शब्बीर अम्मू कुरेशी (पारशाखुंट), मुश्ताक हसन कुरेशी (बेपारी मोहल्ला), रशिद अब्दुल अजीज शेख उर्फ रशीद दंडा (झेंडीगेट), मुबीन मुश्ताक कुरेशी (बेपारी मोहल्ला), जयाज शब्बीर कुरेशी व मुन्ना बाबू कुरेशी (रा. भिंगार) हे आरोपी पसार झाले.