नेवासा शहरात २७ गोवंश जनावरांसह सातशे किलो गोमांस जप्त
By अण्णा नवथर | Published: December 3, 2023 12:53 PM2023-12-03T12:53:07+5:302023-12-03T12:53:48+5:30
Ahmednagar Crime News: नेवासा शहरात छापा टाकून कत्तलीसाठी आणलेल्या २७ गोवंश जनावरांसह सातशे किलो गोमांस, असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अण्णा नवथर
अहमदनगर - नेवासा शहरात छापा टाकून कत्तलीसाठी आणलेल्या २७ गोवंश जनावरांसह सातशे किलो गोमांस, असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैफ मुस्ताक शेख,रफिक नुर महंमद शेख,रियाज कादर चौधरी( रा.नाईकवाडी मोहल्ला ,नेवासा), अरबाज जलाल कुरेशी, राजू अकबर कुरेशी (रा.सिल्लेखाणा औरंगाबाद) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी आहे की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना नेवासा येथील नाईकवाडी मोहल्ला येथे गोवंश जनावरे डांबून ठेवत गोमांस विक्री करत असल्याची गोपनीय बातमी मिळाली. त्यानंतर त्याच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलिस उपनिरीक्षक मनोहर शेजवळ व पथकतील पोलिस कर्मचारी हे नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप ढाकणे व स्थानिक पोलीस कर्मचारी व दोन पंचांना सोबत घेवून वरील ठिकाणी रविवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास गेले असता एका पत्र्याच्या शेड मध्ये वरील पाच जण हे गोमांसासह तेथे दिसले.
सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी सदर व्यक्तींकडे चौकशी केली असता कैफ मुस्ताक शेख,रफिक नुर महंमद शेख,रियाज कादर चौधरी( रा.नाईकवाडी मोहल्ला ,नेवासा), अरबाज जलाल कुरेशी,राजू अकबर कुरेशी (रा.सिल्लेखाणा औरंगाबाद)नावे सांगितली. सदर कत्तलखाना कैफ मुस्ताक शेख हा चालवत असल्याचे सांगितले. सदर ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असता पत्र्याच्या शेड मध्ये चाऱ्याविना २७ गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे आढळून आले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.