अहमदनगर: केडगावातील हॉटेलवर दगडफेक, पुणे महामार्गावर रास्ता रोको
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 11:55 PM2023-02-14T23:55:50+5:302023-02-14T23:56:04+5:30
दोन गटांतील वाद : लग्नातील वादाचे पडसाद केडगावमध्ये
अहमदनगर: औरंगाबाद रोडवरील एका राजकीय नेत्यांच्या मुलाच्या लग्नसमारंभात झालेल्या वादाचे पडसाद केडगावमध्ये उमटले. मंगळवारी रात्री एका हॉटेलवर दगडफेक केल्याने दुसऱ्या गटाने पुणे महामार्गावर ठाण मांडत कारवाईची मागणी केली. दरम्यान, कोतवाली पोलिसांचा मोठा फौजफाटा केडगावात पोहोचला असून, याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय व शिवसेनेचे शहरप्रमुख (बाळासाहेबांची शिवसेना) दिलीप सातपुते यांचे चिरंजीव ओमकार यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये एका लग्नसमारंभात सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास वाद झाला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी केडगाव येथे मोठा बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस बंदोबस्त असतानाही मोटारसायकलवरून आलेल्या ८ ते १० जणांनी केडगाव येथील शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या हॉटेलवर दगडफेक केली. या दगडफेकीत काही वाहनांच्या काचा फुटल्या. त्यामुळे दुसऱ्या गटाने दगडफेक करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी पुणे महामार्गावर ठिय्या मांडला.
दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे. त्यामुळे जागेवरच फिर्याद घेता येणार नाही. त्यासाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल, अशी माहिती दिली. पोलिसांशी झालेल्या चर्चेनुसार ओमकार सातपुते यांच्यासह कार्यकर्ते रात्री अकरा वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यात दाखल होण्यासाठी केडगाव ते कोतवाली पोलीस ठाण्यापर्यंत पायी आले. पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.