BREAKING: पाथर्डीच्या जवखेडे खालसा हत्याकांडातील तिघा आरोपींची निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 06:46 PM2022-05-31T18:46:16+5:302022-05-31T18:46:40+5:30
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांड खटल्यात प्रथम प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधारकर यार्लगडडा यांनी मंगळवारी तिनही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांड खटल्यात प्रथम प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधारकर यार्लगडडा यांनी मंगळवारी तिनही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. प्रशांत दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव व दिलीप जगन्नाथ जाधव असे निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींची नावे आहेत.
21 ऑक्टोबर 2014 रोजी जवखेडे खालसा( ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) येथे संजय जगन्नाथ जाधव, जयश्री संजय जाधव व सुनील संजय जाधव या एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. मयत व्यक्ती पती-पत्नी व मुलगा होते. याप्रकरणी मयत संजय जाधव यांचा पुतण्या प्रशांत दिलीप जाधव याने पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविला होता.
एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याने संपूर्ण राज्य ढवळून निघाले होते. या गुन्ह्याची व्याप्ती पाहून विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र प्रवीण साळुंके दीड महिना घटनास्थळी तळ ठोकून होते. त्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने या तिहेरी हत्याकांडचा कसून तपास केला. संशयित व काही स्थानिक नागरिकांची नार्को व इतर मानसशास्त्रीय चाचण्या केल्यानंतर मयत जाधव कुटुंबीयांच्या घरातीलच प्रशांत दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव आणि दिलीप जगन्नाथ जाधव यांनी खून केल्याचे तपासात समोर आले होते. त्यावरून या गुन्ह्यात आरोपी प्रशांत दिलीप जाधव यास ३ डिसेंबर २०१४ रोजी आणि अशोक दिलीप जाधव याला ७ डिसेंबर २०१४ रोजी व आरोपी दिलीप जाधव याला १८ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती.
तपास अधिकारी पोलिस निरीक्षक शाशिराज पाटोळे यांनी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या खटल्यात महाराष्ट्र शासनाने फौजदारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली. या खटल्यात मात्र सरकारी पक्षाला आरोपी विरोधातील दोष सिद्ध न करता आल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.