गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसचं इंजिन रुळावरुन घसरलं, चालकाच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 08:33 AM2018-01-12T08:33:17+5:302018-01-12T08:35:25+5:30
भारतीय रेल्वे मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. गुरुवारी गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसला अहमदनगर येथे अपघात झाला.
अहमदनगर - भारतीय रेल्वे मार्गावरीलअपघातांची मालिका सुरूच आहे. गुरुवारी गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसला अहमदनगर येथे अपघात झाला. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. श्रीगोंद्यात रेल्वेमार्ग खचल्यानंतर मोटरमनने वेळीच ट्रेनवर नियंत्रण मिळवल्यामुळे संभाव्य अपघात टळला. त्यानंतर या मार्गावर रेल्वेचा खोळंबा झाला आहे. श्रीगोंद्यात घारगावजवळ रेल्वे मार्ग खचल्यामुळे गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसचं इंजिन रुळाला घासलं गेलं. यात रेल्वे रुळाला मोठा तडा गेला. पण चालकाने प्रसंगावधान राखत वेगावर नियंत्रण मिळवलं आणि मोठा अपघात टळला.
गुरुवारी (11 जानेवारी) दुपारी साधारण साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रुळाला तडे गेल्याने क्रेनच्या सहाय्यानं इंजिन हटवण्यात आलं, तर रेल्वेच्या डब्यांना पाठीमागून इंजिन जोडून विसापूरला आणण्यात आलं. या अपघातामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. रात्री दीड वाजता खचलेला रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यात आला आणि तडे गेलेल्या रुळावर दुसरा पर्यायी रुळ टाकल्यानंतर गोवा एक्स्प्रेस रवाना झाली.
घारगावच्या परिसरात रेल्वे मार्गावरील गेट बंद करुन बोगद्याचं काम सुरू आहे. या कामासाठी चार तासाचा ब्लॉक घेण्यात आला होता. काम झाल्यानंतर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, मात्र पटरीच्या खाली मातीचा भराव व्यवस्थित टाकण्यात आला नव्हता. त्यामुळे रेल्वे येताच वजनानं भराव खचला आणि रुळाला तडे गेले.
शेजारीच बोगद्यासाठी तब्बल 20 ते 30 फुटांचा खोल खड्डा खोदण्यात आला आहे. रेल्वेचा वेग कमी असल्यामुळे चालकानं त्वरीत परिस्थिती नियंत्रणात आणली व मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेमुळे मनमाड-दौंड मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. या मार्गावरील अनेक पॅसेंजर आणि एक्स्प्रेस गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या.
Maharashtra: Rail traffic halted after fracture was detected on rail track from Pune to Manmad in Ahmednagar's Ghargaon. The issue came to light earlier this evening. pic.twitter.com/zcX4XYvd6z
— ANI (@ANI) January 11, 2018