अवकाळी पावसाचा फटका; 20 मेंढ्यांचा-कोकरांचा मृत्यू; मृत मेंढ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 12:10 PM2021-12-02T12:10:01+5:302021-12-02T12:15:25+5:30
दरम्यान, माहिती मिळताच नांदूर खंदरमाळ गावचे तलाठी युवराज सिंग जारवाल,महसूल कर्मचारी गणेश सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी भास्कर कुतळ यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
अहमदनगर- अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ व खंदरमाळवाडी शिवारात २० मेंढ्या व कोकरांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (2 डिसेंबर)सकाळी घडली. यात मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागात बुधवारी काही प्रमाणात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. याचा फटका मेंढपाळांनाही बसत आहे.
पठारभागात चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर दरवर्षी साकुर पठार भागातील मेंढपाळ लगतच्या पुणे जिल्ह्यात मेंढ्या चारण्यासाठी जात असतात. सतु रेवजी सोडनर,संदीप शंकर जांबुळकर, संजु लहानु झिटे (सर्व राहणार मांडवे बु. ता.संगमनेर) सिद्धु सावळेराम कोकरे (रा. चिंचेवाडी,साकुर)पोपट गंगाराम कुदनर (रा.शिंदोडी ता.संगमनेर), मारुती हरी कुळाळ रा. जांबुत बु.) हे मेंढपाळ काही दिवसांपूर्वी मेंढ्या घेऊन पुणे जिल्ह्यात गेले होते. ते पुन्हा साकुर पठारभागात परतत असताना, नांदूर खंदरमाळ व खंदरमाळ येथील माळरानावर मुक्कामी होते. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे झालेल्या अवकाळी पावसाने व थंडीने २० मेंढ्या व कोकरांचा मृत्यू झाला आहे. मृत मेंढ्या व कोकरांचा संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचे मेंढपाळ संजय झिठे यांनी सांगितले.
दरम्यान, माहिती मिळताच नांदूर खंदरमाळ गावचे तलाठी युवराज सिंग जारवाल,महसूल कर्मचारी गणेश सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी भास्कर कुतळ यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.