अहमदनगरच्या के. के. रेंजवर युद्ध सरावाचा थरार
By साहेबराव नरसाळे | Published: January 28, 2023 12:57 PM2023-01-28T12:57:02+5:302023-01-28T12:57:47+5:30
के. के. रेंज या लष्कराच्या युद्ध सराव भूमीवर शनिवारी (दि. २८) नेपाळ व निमंत्रित मित्र राष्ट्राच्या सैन्यांसमोर भारतीय लष्कराने एक तास युद्ध सरावाची प्रात्यक्षिके दाखविली.
अहमदनगर : लष्काराचे टेहळणी हेलीकॉप्टर, धुरांचे लोट उसळत शत्रूवर चाल करुन जाणारे अत्याधुनिक रणगाडे, कानठळ्या बसवणाऱ्या तोफांचा मारा, क्षेपणास्त्रांचा मारा, गोळीबार असा युद्ध भूमीवरचा थरार अहमदनगरजवळील के. के. रेंजवर रंगला. निमित्त होते लष्कराच्या युद्ध सराव प्रात्यक्षिकांचे!
के. के. रेंज या लष्कराच्या युद्ध सराव भूमीवर शनिवारी (दि. २८) नेपाळ व निमंत्रित मित्र राष्ट्राच्या सैन्यांसमोर भारतीय लष्कराने एक तास युद्ध सरावाची प्रात्यक्षिके दाखविली. भारतीय सैन्याच्या प्रमुख प्रशिक्षण संस्था असलेल्या आर्मड कॉर्प्स सेंटर व स्कूल, मॅकेनाइज्ड इन्फंट्री सेंटर यांच्या वतीने मेजर जनरल अनिलराज सिंग काहलो यांच्या मार्गदर्शनाखाली हे युद्ध सराव प्रात्यक्षिक घेण्यात आले. या युद्ध सरावात ड्रोनच्या मदतीने शत्रूवर पाळत ठेवून शत्रूला एका सेकंदात निष्प्रभ करण्यच्या लष्कराच्या क्षमतेचे प्रदर्शन दाखविण्यात आले.
रणगाड्यांवरून तोफांचा मारा, बॉम्ब वर्षाव करण्यात आला. रणगाड्यांमधून आगीचे लोळ सोडत काही क्षणात शत्रूला भस्मसात करणाऱ्या तोफांचा मारा करण्यात आला. अर्जुन, भीष्म, अजय, टी-९०, टी-७२, बीएमपी-२ या अत्याधुनिक तंत्रप्रणाली असणाऱ्या रणगाड्यांमधून अचूक मारा करीत शत्रूचा नाश कसा करता येऊ शकतो हे दाखविण्यात आले. अर्जुन, भीष्म, अजय, टी-९०, टी-७२, अजय, एमबीटी अर्जुन, बीएमपी-२ या अत्याधुनिक रणगाड्यांद्वारे शत्रूचा अचूक निशाणा साधण्यात भारतीय सैन्याला यश आले. या रणगाड्यांमध्ये धूर निर्माण करण्याची अतिउच्च क्षमता आहे. त्यामुळे धोक्याच्या परिस्थितीत शत्रूला हुलकावणी देऊन पुन्हा तीव्र हल्ला चढविण्याचे सामर्थ्य या रणगाड्यांमध्ये आहे. या रणगाड्यांमध्ये गन, अणु युद्धात शत्रूचा मारा निष्प्रभ करण्याची क्षमता आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या प्रात्यक्षिकांनंतर उपस्थितांना जवळून रणगाडे, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे दाखविण्यात आले.